सासवड, पुणे ८ फेब्रुवारी २०२४ : पुण्यातील सासवड तहसीलदार कार्यालयातून ईएमव्ही मशीन चोरीला गेल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर प्रशासनाला खडबडून जाग आली होती. घटनास्थळी जिल्हाधिकारी आणि अन्य महत्त्वाच्या अधिकाऱ्यांनी भेटी देत पाहणी केली आहे. मात्र यात आता मोठी घडामोड समोर येत असून या चोरी प्रकरणी निवडणूक आयोगाने मोठी कारवाई केली आहे. यात पुरंदरचे तहसीलदार, उपविभागीय अधिकारी आणि डीवायएसपी यांचे निलंबन करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. या चोरी बाबतचा अहवाल देखील मागवण्यात आला आहे.
पुरंदर तालुक्यातील सासवड येथे सोमवारी ईव्हीएम मशीन चोरीचा प्रकार समोर आला होता, यानंतर पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले. या दोघांकडून मशीन पोलिसांनी हस्तगत केल्या तसेच आणखी एक आरोपी पकडण्यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत. या गुन्ह्यामध्ये आणखी कोण सामील आहे का ? याबाबतचा तपास पोलीस प्रशासनाकडून केला जात आहे. पोलीस प्रशासनाकडून अद्याप याबाबतची माहिती दिली जात नाही. मात्र या संदर्भात सुरू असलेल्या कारवाईला उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडून पुष्टी मिळते आहे.
ई एम व्ही मशीन चोरी गेल्याने प्रशासकीय कामात हलगर्जीपणा झाल्याच्या चर्चा होऊ लागल्या होत्या. त्याची दखल जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः घेतली होती. त्याबाबतचे अहवाल देखील त्यांच्याकडून मागवण्यात आला आहे. याप्रकरणी तहसीलदार विक्रम राजपूत, उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे, पोलिस अधिकारी तानाजी बेर्डे अशी निलंबन केलेल्यांची नावे आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी : राहुल शिंदे