भुममध्ये थरार! पोलिसावर तलवारीने हल्ला – एक जण जखमी, आरोपी अटकेत

Thriller in Bhum! Sword attack on police – One injured, accused arrested
भुम शहरात सोमवारी रात्री एक दहशतजनक घटना घडली. पोलिसांवर ड्युटीवर असताना तलवारीने जीवघेणा हल्ला करण्यात आला असून, या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी झाला आहे. आरोपीने पोलिस ठाण्यातही तोडफोड करून गावात अक्षरशः थरकाप उडवला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम संजय भोसले (रा. भुम) याने पोलिस हेडकॉन्स्टेबल गणेश दत्तू पाटील यांच्यावर, ते ड्युटीवर असताना, जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने तलवारीने हल्ला केला. सुदैवाने गणेश पाटील यांनी वेळेवर सावधगिरी बाळगून वार चुकवला आणि थोडक्यात बचावले.

मात्र त्यांच्या सोबत असलेले दत्ता शिंदे यांच्यावर तलवारीने वार करत गंभीर जखमी केले. एवढ्यावरच न थांबता, आरोपीने पोलीस ठाण्यातील टेबलवरील काच फोडून तोडफोड केली आणि आणखी दोन पोलिस – हवालदार कवडे व शिंदे यांनाही मारहाण करण्याचा प्रयत्न केला.

या हल्ल्यामुळे गावात प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गंभीर आरोपही आरोपीवर ठेवण्यात आला आहे.

पोलिस हेडकॉन्स्टेबल गणेश पाटील यांच्या फिर्यादीवरून शुभम भोसले याच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. आरोपीस न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

ही घटना पोलिस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण करत असून, पोलिसांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी रहीम शेख, धाराशिव