नवी दिल्ली, दि. २१ मे २०२०: एका दगडात दोन शिकार कशा कराव्यात असे रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांना विचारावे. जगातील इतर कंपन्या आपले अस्तित्व वाचवण्यासाठी धडपडत आहेत, लॉकडाऊन दरम्यान काही आठवड्यांत अंबानी यांनी फेसबुक, जनरल अटलांटिक, सिल्व्हर लेक आणि व्हिस्टा इक्विटी पार्टनर अशा चार परदेशी कंपन्यांशी करार केले आहेत. खरं तर रिलायन्सला ‘न्यू कॉमर्स’ च्या रूपाने वाढीचं नवं इंजिन मिळालं आहे.
• ६७,१९५ कोटींची गुंतवणूक
या सर्व सौद्यांमधून रिलायन्सला सुमारे ६७,१९५ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. रिलायन्सचे कर्ज फेडण्यासाठी यातील मोठा भाग गुंतविला जाईल. या सौद्यांसह, रिलायन्स आपली उद्योगाची गाडी वाढीच्या पुढील स्थानकावर नेण्यास तयार आहे.
• रिलायन्सचे न्यू कॉमर्स म्हणजे काय
जुलै २०१८ मध्ये अंबानी यांनी आपला ‘न्यू कॉमर्स’ उपक्रम सुरू केला तेव्हा ते म्हणाले की, न्यू कॉमर्समुळे उद्योग विश्वाला नवीन परिभाषा प्राप्त होईल. इतकेच नव्हे तर न्यू कॉमर्स पुढच्या काही वर्षांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजसाठी नवीन इंजिन म्हणून देखील काम करेल. याद्वारे रिलायन्स डिजिटल आणि भौतिक बाजारपेठ एकत्र करेल आणि एमएसएमई, शेतकरी आणि किराणा दुकानदार यांना याच्या अफाट नेटवर्कचे फायदे होतील. यू एस महाकाय फेसबुकशी करार करून ही कंपनी आपल्या मालकीच्या व्हॉट्सअॅपच्या व्यापक पोहचचा फायदा घेईल आणि आपल्या नव्या वाणिज्य व्यवसायाला चालना देईल.
• दोन्ही कंपन्यांना फायदा
यात केवळ रिलायन्सला फायदा होणार नाही तर रिलायन्स मध्ये गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांना देखील याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे. भविष्यात रिलायन्स जिओ मध्ये अनेक मोठ्या कंपन्या गुंतवणूक करण्याची शक्यता आहे. जिओचे भारतामध्ये नेटवर्क मोठ्या प्रमाणावर पसरलेले आहे. याचा फायदा फेसबुकला व इतर गुंतवणूकदार कंपन्यांना होणार आहे. कारण जिओच्या नेटवर्कच्या माध्यमातून त्यांना आपला व्यवसाय तसेच भविष्यातील नवीन योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी फायदा होणार आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीज जिओला केवळ एक टेलिकॉम कंपनी म्हणून नाही तर एक डिजिटल कंपनी म्हणून विकसित करत आहे. मुकेश अंबानी आता त्यांच्या रिलायन्स कंपनीला केवळ एनर्जी सेक्टरमधील कंपनी न ठेवता या कंपनीला सर्व क्षेत्रांमध्ये व्यापक बाजारपेठ मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत. याचे एक उदाहरण म्हणजे २००६ मध्ये रिलायन्स एक रिटेल कंपनी म्हणून उदयास आली होती तर २०१० मध्ये रिलायन्स ने टेलिकॉम कंपनी मध्ये सुद्धा पदार्पण केले.
न्यूज अनकट प्रतिनिधी