राष्ट्रीय: दि. १२ मे २०२०: देशाच्या विविध भागात अडकलेले स्थलांतरित मजूर, यात्रेकरू, पर्यटक, विद्यार्थी आणि इतर व्यक्तींना विशेष रेल्वेने आपल्या मूळ गावी परत जाता यावे याबाबत केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशानंतर रेल्वेने श्रमिक विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला.
१२ मे २०२० पर्यंत देशाच्या विविध राज्यातून ५४२ “श्रमिक विशेष” रेल्वे गाड्या चालवण्यात आल्या, यापैकी ४४८ गाड्या आपल्या नियोजित स्थानी पोहोचल्या तर ९४ गाड्या आपल्या नियोजित ठिकाणी पोहचण्याच्या मार्गावर आहेत.
या ४४८ गाड्यांपैकी, आंध्रप्रदेश (१ गाडी), बिहार (११७ गाड्या), हिमाचल प्रदेश (१ गाडी), झारखंड (२७ गाड्या), कर्नाटक (१ गाडी), मध्य प्रदेश (३८ गाड्या), महाराष्ट्र (३ गाड्या), ओदिशा (२९ गाड्या), राजस्थान (४ गाड्या), तामिळनाडू (१ गाडी), तेलंगणा (२ गाड्या), उत्तरप्रदेश (२२१ गाड्या), पश्चिम बंगाल (२ गाड्या) अशाप्रकारे राज्यात त्यांचा प्रवास पूर्ण झाला.
या गाड्यांनी तिरुचिराप्पल्ली, टिटलागड, बरौनी, खंडवा, जगन्नाथपूर, खुर्दा रोड, प्रयागराज, छपरा, बलिया, गया, पूर्णिया, वाराणसी, दरभंगा, गोरखपूर, लखनौ, जौनपुर, हतिया, बस्ती, कथिहार, दानापूर, मुझफ्फरपूर, सहारसा इत्यादी ठिकाणी प्रवाशांना पोहोचवले आहे.
श्रमिक विशेष रेल्वे गाडी सुरु होण्यापूर्वी प्रवाशांची तपासणी सुनिश्चित करण्यात येते. प्रवासादरम्यान प्रवाशांना मोफत भोजन आणि पाणी पुरविले जाते.
न्यूज अनकट प्रतिनिधी