पुणे, १६ डिसेंबर २०२२ : केन विल्यमसनने राजीनामा दिल्यानंतर न्यूझीलंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज टीम साऊदीच्या खांद्यावर कसोटी संघाची जबाबदारी सोपविण्यात आली. पाकिस्तान दौऱ्यात टीम साऊदी न्यूझीलंडच्या कसोटी संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. तर टॉम लॅथम संघाच्या उपकर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहे. टीम साऊदी हा न्यूझीलंड संघाचा ३१ वा कसोटी कर्णधार बनला आहे. याआधी त्याने न्यूझीलंडच्या टी-२० संघाचे नेतृत्वही केले आहे.
न्यूझीलंड कसोटी संघाचे कर्णधारपद सोडण्याबाबत केन विल्यमसन म्हणाला, की कसोटीचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेण्याची हीच योग्य वेळ आहे. कसोटी संघाचे कर्णधारपद भूषविणे हा माझ्यासाठी बहुमान आहे. कसोटी क्रिकेट माझ्यासाठी अव्वल दर्जाचे आहे आणि त्याचा कर्णधार म्हणून मी आव्हानांचा आनंद घेतला.
कर्णधार म्हणून तुमचे काम आणि कामाचा ताण वाढतो. माझ्या कारकीर्दीच्या या टप्प्यावर मला वाटले, की कसोटी कर्णधारपद सोडण्याची हीच योग्य वेळ आहे. केन विल्यमसन हा न्यूझीलंडच्या महान कसोटी कर्णधारांपैकी एक आहे. केनच्या नेतृत्वाखाली किवी संघाने भारताचा पराभव करून पहिली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकली होती. केनच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडच्या संघाने ३८ पैकी २२ सामने जिंकले आहेत. तर आठ सामने गमावले आहेत आणि आठ सामने अनिर्णीत राहिले आहेत.
पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंड संघ :
टीम साऊदी (कर्णधार), मायकेल ब्रेसवेल, टॉम ब्लंडेल (यष्टिरक्षक), डेव्हॉन कॉन्वे, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरिल मिशेल, हेन्री निकोल्स, एजाज पटेल, ग्लेन फिलिप्स, ईश सोढी, ब्लेअर टिकनर, नील वॅगनर, केन विल्यमसन, विल यंग.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सतीश पाटील