पुण्यात पुन्हा एकदा गुन्हेगार टोळ्यांच्या हालचाली वाढत आहेत. त्यामुळे पोलिसांनी अशा टोळ्यांवर मोठी कारवाई सुरू केली आहे. आंदेकर टोळीनंतर आता टिपू पठाण टोळीवर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे.
हडपसर भागात बनावट कागदपत्रांच्या आधारे मालमत्ता बळकावून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या या टोळीवर काळेपडळ पोलिसांनी छापा टाकला. या वेळी टोळीचा प्रमुख रिझवान उर्फ टिपू पठाण आणि त्याच्या साथीदारांच्या बँक खात्यांवर बंदी घालण्यात आली. तसेच त्यांच्या अनधिकृत बांधकामांवर पाडकाम सुरू आहे.
पोलिसांनी झडती दरम्यान एसी, टीव्ही, फ्रीज, फर्निचर, वॉशिंग मशिन यांसारख्या लाखो रुपयांच्या वस्तू जप्त केल्या. आरोपींच्या संशयास्पद बँक व्यवहारांची चौकशी आणि बनावट साठेखतांची पडताळणीही सुरू आहे. आरोपीच्या नावावर असलेली इनोव्हा कार देखील पोलिसांनी जप्त केली आहे.
टोळीने हडपसरमधील ११ गुंठे जागा बनावट कागदपत्रांद्वारे बळकावून त्या जागेवर बेकायदेशीर बांधकाम केले होते. पुणे महापालिकेच्या पथकाने आता त्या बांधकामांवर पाडकाम सुरू केले आहे.
ही कारवाई पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस आयुक्त धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ निरीक्षक मानसिंग पाटील, आणि पोलिस निरीक्षक अमर काळंगे यांच्या पथकाने केली.
डॉ. शिंदे म्हणाले,
“बनावट कागदपत्रांवर नागरिकांची फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. कुणालाही सूट दिली जाणार नाही.”
या कारवाईनंतर हडपसर परिसरातील नागरिकांनी पोलिसांचे कौतुक केले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी ध्रुव पाटील












































