कोलकत्ता, १२ जुलै २०२३ : पश्चिम बंगालमध्ये ९ जुलै रोजी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल हाती आला असून या लढाईत तृणमूल काँग्रेसने आघाडी घेतली आहे. कालिम्पाँग आणि दार्जिलिंग हे दोन जिल्हे सोडले तर इतर जिल्ह्यात तृणमूलने दणदणीत विजय मिळवला. तर, राज्यात आता तृणमूलनंतर भाजपा पक्ष दुसऱ्या स्थानी, डावे आणि काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे विरोधी पक्ष म्हणून भाजपा असणार आहे.
बिनविरोध टीएमसी
शनिवारी ८ जुलै रोजी पश्चिम बंगालच्या ७३ हजार ८८७ ग्रामपंचायत जागांपैकी, ६४ हजार ८७४ जागांवर मतदान झाले. उरलेल्या ९ हजार १२ जागांवर बिनविरोध निवडणूक झाली. या बिनविरोध निवडणुकीत सर्वाधिक म्हणजे ८ हजार ८७४ जागांवर तृणमूल काँग्रेस विजयी झाला आहे.
आलेल्या निकालानुसार, टीएमसी ने एकूण ६३ हजार २२९ पैकी २९ हजार ६६५ ग्रामपंचायतीच्या जागांवर विजय मिळवला आहे. भाजप ८ हजार २१, सीपीएम २ हजार ४७२ आणि काँग्रेस २ हजार ९४ जागांवर विजयी ठरले आहेत.
सुरुवातीला मालदा आणि मर्शिदाबाद जिल्ह्यांमध्ये काँग्रेस आणि सीपीआय यांची युती आघाडीवर होती. जानेवारीत झालेल्या मुर्शिदाबाद सागरदिघी विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने विजय मिळवला होता. त्यामुळे येथील ग्रामपंचायतही काँग्रेसच मिळवेल अशी अपेक्षा होती, परंतु सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये टीएमसी दोन्ही जिल्ह्यांमध्ये विरोधकांच्या पुढे होती.
इंडियन सेक्युलर फ्रंट -आयएसएफ, बंगालमध्ये नव्याने उभारत असून या पक्षाने भांगर मतदारसंघात चांगली कामगिरी केली आहे. ISF ने CPI(M) आणि भूसंपादन विरोधी समितीसोबत युती करून भांगरच्या काही ब्लॉक्समध्ये TMC विरोधात झुंज दिली. याच भागात मतदानावेळी हिंसाचार घडला होता.
पंचायत समिती निवडणुकीतही तृणमूल काँग्रेस विजयी ठरला आहे. पंचायत समित्यांमध्ये, तृणमूलने ९ हजार ७४० जागांपैकी २ हजार १५५ जागा जिंकल्या तर भाजपने २१४ पंचायत समित्या जिंकल्या, आणि डाव्या आघाडीला ४७ तसेच काँग्रेसला ३८ जागा मिळाल्या आहेत. अपक्ष उमेदवारांनी ५८ जागा जिंकल्या असून काहींचे निकाल अजूनही लागलेले नाही. रात्री १० वाजेपर्यंत राज्यभरातील एकूण ३४१ पंचायत समित्यांपैकी पैकी १२९ जागा तृणमूलने जिंकल्या आहेत. भाजपला ९ आणि डाव्या आघाडीला ३ जागा मिळाल्या आहेत.
जिल्हा परिषदेतही तृणमूलच वरचढ ठरली. ग्रामपंचायत, पंचायत समितीसह जिल्हा परिषदेतही तृणमूलने आपला झेंडा रोवला आहे. सुरू असलेल्या मतमोजणीत ९२८ जाागांपैकी ७७ जागा तृणमूलने जिंकल्या आहेत. भाजपा १० जागांवर आघाडीवर आहे, तर सीपीआय एम ५ जागांवर विजयी झाली असून काही जागांचा निकाल येणे अजुन बाकी आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे