सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्याचे आवाहन

31

नीरा: कोरोना या रोगाबाबत नागरिकांनी कोणतीही भीती बाळगू नये अथवा घाबरून जावू नये. मात्र त्याचा प्रसार होवू नये, यासाठी प्रत्येकाने सावधानता बाळगावी. त्याचप्रमाणे आपल्या गावांतील  सार्वजनिक कार्यक्रम, यात्रा, जत्रा यांसारखे मोठे कार्यक्रम रद्द करावेत. मंगल कार्यालयांच्या मालकांनी कोणत्याही प्रकारचे बुकिंग करू नये. असे आवाहन करतानाच सोशेल मिडीयाच्या माध्यमातून अफवा पसरवून घबराटीचे वातावरण निर्माण न करता जनजागृती करण्याचे आवाहन पुरंदरच्या तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी केले आहे.
सासवड ( ता.पुरंदर ) येथील पंचायत समिती मध्ये तहसीलदार रुपाली सरनोबत यांच्या अध्यक्षतेखाली ” कारोना रोगाविषयी घ्यावयाची काळजी आणि उपाय योजना ” याबाबत शासकीय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.

यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मिलिंद मोरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभय तिडके, सासवड येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. किरण राऊत, प्रशिक्षक श्री जगताप त्याच प्रमाणे आरोग्य, पंचायत विभागांचे विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
क्षेत्र जेजुरी, क्षेत्र नारायणपूर, क्षेत्र कापूरहोळ येथील बालाजी मंदिर आदी मंदिर व्यवस्थापनांना मोठे कार्यक्रम न घेण्याबाबत सूचना केल्या आहेत. त्याचप्रमाणे मार्च महिन्यात ज्या गावांच्या यात्रा – उत्सव असतील त्या गावांची यादी सोमवारपर्यंत तयार करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी प्रशासनाला दिले आहेत.
दरम्यान पुरंदर तालुक्यात या रोगाची कोणत्याही प्रकारची लक्षणे दिसून येत नाहीत अथवा एकही संशयित व्यक्तीही नाही. त्यामुळे यांबाबत कोणत्याही माध्यमातून अफवा पसरवू नयेत किंवा अफवांना बळी पडू नये असे आवाहन तहसीलदार सरनोबत यांनी केले आहे.
याबाबत आरोग्य अधिकारी डॉ. अभय तिडके यांनी सांगितले कि, ज्या व्यक्तींना खोकला, दमा, सर्दी, ताप यांसारखे कोणत्याही प्रकारचे आजार असल्यास त्यांनी त्वरित उपचार करून घ्यावेत. तसेच मास्क  वापरावा. वैयक्तिक स्वच्छता ठेवतानाच घराचा परिसर स्वच्छ ठेवण्यास प्राधान्य द्यावे. एकमेकांशी संवाद साधताना किमान एक मीटर अथवा तीन फुटांचे अंतर असावे. हात सानीटायझर अथवा साबणाने वारंवार स्वच्छ धुवावा. त्याच प्रमाणे ग्रामीण भागातील आरोग्य केंद्राच्या माध्यमातून गावांमधून सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
सासवडच्या ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. किरण राऊत यांनीही नागरिकांना आजाराची भीती न बाळगता वयक्तिक स्वच्छता राखण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही प्रकारची लक्षणे आढळून आल्यास त्वरित डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला दिला आहे.
तालुक्यातील सर्वच आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, ग्रामसेवक, सरपंच, तलाठी  आणि सर्वच स्तरांवरील कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सर्वच प्रकारच्या आजारांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. नागरिकांमध्ये कोणत्याही प्रकारच्या आजाराची लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला गटविकास अधिकारी मिलिंद मोरे यांनी दिला आहे. गावांमधून यारोगाबाबत जनजागृती करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा