माढा, २ जानेवारी २०२१: मातंग समाजाला स्वतंत्र अ, ब, क, ड वर्गवारी करुन आरक्षण देण्यात यावे, लोकशाहिर आण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ पूर्ववत सुरू करावे व त्यास सुमारे एक हजार कोटी वाढीव अनुदान देण्यात यावे, बारटीच्या धर्तीवर आर.टी ची स्थापना करावी अशा मागण्या दलित महासंघाकडून करण्यात येत आहेत.
याव्यतिरिक्त मातंग समाजातील भूमिहीन लोकांना शासनाने गायरान जमीन वनखात्याचा जमिनी कसन्यास द्याव्यात, महाराष्ट्र मातंग समाजावरती होत असलेल्या अन्याय अत्याचार थांबवावे, दलित मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती मिळावी, लोकशाहिर आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा अशा विविध मागण्यांसंदर्भात प्रांतकार्यालयासमोर सकाळी ११ ते ४ च्या दरम्यान धरणे आंदोलन करण्यात आले याबाबतचे निवेदन प्रांताधिकारी ज्योती कदम यांना देण्यात आले
सदरच्या निवेदनात म्हटले की, धरणे आंदोलनास सरकारने योग्य प्रतिसाद न दिल्यास पुढील काळात तीव्र आंदोलनाचा इशारा दलित महासंघाच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी तालुकाध्यक्ष तानाजी धडे, रामचंद्र हनवते, अर्जुन लोंढे, रामा सावळे आदी उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील