आदित्य ठाकरेंना पुन्हा लाँच करण्यासाठी, उद्धव ठाकरे यांचा मुंबई महापालिकेवर मोर्चा, संजय शिरसाट यांची कोपरखळी

मुंबई २७ जून २०२३: मुंबई महानगरपालिकेमध्ये गेल्या अनेक वर्षापासून झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करणार असल्याचे, विधान काही दिवसापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. शिवसेना भाजपचे सरकार आल्यापासून उद्धव ठाकरे गटावर कुरघोडी करण्याची एकही संधी हे सरकार सोडत नाही. उपमुख्यमंत्र्यांच्या या विधानानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडूनही प्रतिक्रिया देण्यात आली. चौकशीच करायची असेल तर मुंबई महानगरपालिकेबरोबर महाराष्ट्रातील इतरही महानगरपालिकांची चौकशी करावी असे खुले आव्हानच उद्धव ठाकरे यांनी दिले होते.

उद्धव ठाकरे गटाने मुंबई महापालिकेवर येत्या १ जुलैला महामोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या मोर्चाचे नेतृत्व ठाकरे गटाचे आमदार आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे करणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही घोषणा केली होती. महापालिकेच्या पैशांची उधळपट्टी रोखण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.यासाठी दादर येथील शिवसेना भवनमध्ये उद्धव ठाकरे यांनी माजी नगरसेवकांची बैठक घेतली होती.

याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ही बैठक संघटनेसाठी नाही, तर आदित्य ठाकरे यांना पुन्हा लाँच करण्यासाठी घेतली होती. मुंबई महानगरपालिकेचा नेता कोण तर आदित्य ठाकरे, असे दाखवण्यासाठी ही बैठक झाली. यासाठी शाखाप्रमुख, नगरसेवक, विभाग प्रमुख व इतर सर्वांना वेठीस धरून हा मोर्चा काढावा लागतोय आणि त्यांच्या मोर्चाला लोकांचा प्रतिसाद मिळणार नाही म्हणून ही बैठक आयोजित केली असे संजय शिरसाठ म्हणाले आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी- अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा