गोल पोस्ट महाराष्ट्र हास्यचित्रांच्या किमयागाराला शतकी सलाम करण्यासाठी ‘शि. द. १००’ महोत्सव !

हास्यचित्रांच्या किमयागाराला शतकी सलाम करण्यासाठी ‘शि. द. १००’ महोत्सव !

पुणे १८ जुलै २०२४ : शिवराम दत्तात्रय फडणीस अर्थात सर्वांचे लाडके ज्येष्ठ व्यंगचित्रकार ‘शि. द. फडणीस’ येत्या २९ जुलै रोजी १०० व्या वर्षांत पदार्पण करीत आहेत. ही घटना जगातील व्यंगचित्रकारांच्या दृष्टीने एक मणिकांचन योग आहे. कारण ‘शिदं’च्या रुपाने भारतातील एकमेव सक्रिय व्यंगचित्रकार शतकी वाटचालीत प्रवेश करीत आहे. हा दुग्धशर्करा योग साधून वसुंधरा क्लब आणि कार्टूनिस्ट्स कम्बाईन यांच्या संयुक्त विद्यमाने कोहिनूर प्रस्तुत ‘शि. द. १००’ या भव्य चार दिवसांच्या महोत्सवाचे आयोजन दिनांक २९ जुलै ते १ ऑगस्ट या दरम्यान करण्यात आले आहे, अशी माहिती महोत्सवाचे स्वागताध्यक्ष कोहिनूर ग्रुपचे मुख्य कार्यकारी संचालक कृष्णकुमार गोयल,  सुहृद होम्स अॅन्ड हॉलिडेज, पुणेचे सहसंस्थापक मकरंद केळकर, स्किन सिटीच्या व्यवस्थापकीय संचालक योगिता ढेपे, महोत्सव संयोजक वसुंधरा क्लबचे वीरेंद्र चित्राव आणि कार्टूनिस्ट्स कम्बाईनचे चारुहास पंडित यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

‘शि. द. १००’ या महोत्सवाच्या लोगोचे अनावरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. ‘शि. द. १००’हा महोत्सव रसिकांसाठी विनामूल्य खुला असून या महोत्सवाचे निमंत्रक राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण वस्त्रोद्योग व संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत दादा पाटील आहेत. स्वागताध्यक्ष कोहिनूर ग्रुपचे मुख्य कार्यकारी संचालक कृष्णकुमार गोयल आहेत. या महोत्सवात सोमवार दिनांक २९ जुलै रोजी संध्याकाळी ६.०० वाजता ‘शिदं’चा ह्रद्य नागरी सत्कार सोहळा बालगंधर्व रंगमंदिरात करण्यात येणार आहे.

यावेळी ‘शिदं’चा सन्मान पुणेरी पगडी, उपरणे आणि मानपत्र देऊन करण्यात येणार असुन या कार्यक्रमास अनेकमान्यवर उपस्थित राहणार आहेत. या महोत्सवानिमित्त मंगळवार दिनांक ३० जुलै ते गुरुवार दिनांक १ ऑगस्ट दरम्यान बालगंधर्व कलादालनात ‘हसरी गॅलरी’ हे प्रदर्शन आयोजित केले जाणार असून यामध्ये ‘शिदं’ची गाजलेली व्यंगचित्रे पाहायला मिळणार आहेत. तसेच महाराष्ट्रातील नामांकित व्यंगचित्रकारांनी रेखाटलेल्या शब्दविरहित व्यंगचित्रांचे खास दालन यामध्ये असणार आहे. ‘हसरी गॅलरी’मध्ये महोत्सवाच्या कालावधीत रोज सकाळी ११ ते १ आणि दुपारी ४ ते ६ या वेळेत व्यंगचित्रविषयक वैविध्यपूर्ण कार्यक्रम होणार असून यामध्ये व्याख्यान, परिसंवाद, मान्यवरांशी गप्पा, ‘मास्टर क्लास’ या कार्यक्रमांचा समावेश आहे.

या महोत्सवाच्या निमित्ताने वर्षभरात ‘शिदं’वर विशेष लघुपट तयार करण्यात येणार असून त्याची निर्मिती मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषेत करण्यात येणार आहे. हा महोत्सव पुण्यासह मुंबई, ठाणे, कोल्हापूर, नाशिक, नागपूर, इंदूर, बडोदा, बंगळुरू, हैदराबाद, दिल्ली, अहमदाबाद, पणजी, फोंडा/मडगांव, जळगाव, सांगली,मिरज, रत्नागिरी, छ. संभाजीनगर, सोलापूर, अमरावती, यवतमाळ, पिंपरी-चिंचवड, बेळगाव, चंद्रपूर, अहिल्यानगर अशा विविध ठिकाणी घेण्याचा मानस असल्याचेही संयोजकांनी यावेळी सांगितले.

वसुंधरा क्लब आणि कार्टूनिस्ट्स कम्बाईन यांच्या संयुक्त विद्यमाने कोहिनूर प्रस्तुत ‘शि. द. १००’ या भव्य चार दिवसांच्या महोत्सवाचे आयोजन दिनांक २९ जुलै ते १ ऑगस्ट या दरम्यान करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या लोगोचे चारुहास पंडित, वीरेंद्र चित्राव, कृष्णकुमार गोयल आणि  योगिता ढेपे यांच्या हस्ते आज अनावरण झाले.

न्युज अनकट प्रतिनीधी : जयश्री बोकील

error: Content is protected !!
Exit mobile version