आज १ मे… महाराष्ट्र दिन! खडतर परिस्थितीतून, अमूल्य त्यागातून, अमर्यादित संघर्षातून हा दिवस आज आपल्याला पाहायला मिळतोय. आजची वर्तमान स्थिती पाहता शुभेच्छा देण्याची इच्छा होत नाही परंतू जे स्वतःच्या महाराष्ट्राशी एकनिष्ठ आहेत त्यांना, जे केवळ आणि केवळ त्यांच्या मातृभूमीच्या आणि मातृभाषेच्या विकासाचा विचार आणि कृती करतात त्यांना आजच्या महाराष्ट्र दिनाच्या लाख लाख शुभेच्छा!
महाराष्ट्र ही जर आपली माय आहे तर मुंबई ही त्या महाराष्ट्राचं काळीज आहेत आणि आपण मराठी जन त्या मातेची लेकरं आहोत. आई आणि तीचं काळीज कधी विभक्त होऊ शकेल काय? या महाराष्ट्राला त्याच्या काळजासकट मिळवण्यासाठी या मातेच्या लेकरांना स्वकीयांविरुद्धच संघर्ष करावा लागला. गांधींच्या या स्वतंत्र भारतात गरज नसताना विनाकारण भयंकर नरसंहार घडवला गेला. १०६ जणांच्या अमूल्य बलिदानानंतर छत्रपती शिवरायांची भूमी महाराष्ट्र म्हणून नावारूपास आली नव्हे तर या दुतोंडी, कपटी राजकारण्यांना हा महाराष्ट्र संयुक्त करावा लागला. त्यामुळे हा संयुक्त महाराष्ट्राचा लढा मला अमेरिकेच्या स्वातंत्र्ययुद्धापेक्षाही मोठा वाटतो.
यानिमित्ताने दोन वर्षांपूर्वीचा एक किस्सा मला आपल्यासोबत सामायिक करावासा वाटतो. जो ऐकल्यानंतर आपल्या लक्षात येईल की परिस्थिती किती हाताबाहेर जात चालली आहे. स्वानंद न्यूज या यु ट्यूब वहिनी साठी मी एक प्रश्नमंजुषेचा कार्यक्रम त्यावेळी करत होतो. महाराष्ट्र दिनानिमित्त मी लोकांमध्ये जाऊन काही प्रश्न विचारले. उदा., महाराष्ट्र संयुक्त केव्हा झाला? महाराष्ट्राची राजधानी कोणती? महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण? या प्रश्नांची काय उत्तरं मला मिळाली तीही क्रमशः आपल्याला सांगतो. महाराष्ट्र संयुक्त १५ ऑगस्ट १९४७ रोजी झाला. महाराष्ट्राची राजधानी दिल्ली आहे. तर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आहेत. विचार करायला लावणारी बाब म्हणजे यात फक्त आजचा तरुणवर्ग नव्हता तर प्रौढांनाही ठाऊक नव्हतं. वरील प्रश्नांची योग्य उत्तरं मला अनपेक्षितरीत्या काही परप्रांतीयांकडून मिळाली. ज्यांचा या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याशी खरंतर काहीच संबंध नाही. एव्हाना आपल्या लक्षात आलंच असेल की परिस्थिती किती हाताबाहेर गेलीये. मग प्रश्न नक्कीच पडतो की या सगळ्याला कारणीभूत कोण? उत्तर मिळतं आपण स्वतःच…
ही अशी परिस्थिती होण्यासाठी जितकं सरकार जबाबदार आहे तितकेच आपणही आहोत. आधी सरकार बद्दल बोलूयात मग आपल्याबद्दल बोलतो.
राज्यात १९६४ चा राजभाषा अधिनियम कायदा आहे या कायद्यांतर्गत शासकीय प्रशासकीय व्यवहारच फक्त सक्तीने मराठीत होतात परंतू किती मंत्री, शासकीय अधिकारी या कायद्यांतर्गत सक्तीने मराठीचा वापर करतात? खुद्द मुख्यमंत्र्यांना याचा विसर पडतो (की दिल्लीला खुश करण्यासाठी जाणूनबुजून)आणि जागोजागी मराठी ऐवजी हिंदीचा सर्रास वापर केला जातो. माजी मुख्यमंत्री फडणवीसांनी तर साऱ्या मर्यादाच ओलांडल्या होत्या. जणू काही दिल्लीकरांमार्फत स्वतंत्र विदर्भ वेगळा करून उर्वरित महाराष्ट्र गुजरातमध्ये विलीन करायला ते निघाले होते. दिल्लीकरांना खुश करणारे फडणवीस हे काही पहिले मुख्यमंत्री नाहीत महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्यमंत्र्यांपासून सर्वांची कारकीर्द देखील दिल्लीकरांना खुश करण्यातच गेली. मध्ये विसाव्या शतकाच्या शेवटी शिवसेना या प्रादेशिक मनोहर जोशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. परंतु त्यांच्या काळात तर आणखीन परिस्थिती खालावली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी मुंबईत फुकट घरांच्या घोषणा केल्या आणि अर्धा उत्तर भारत मुंबईत येऊन स्थायिक झाला. साहेब ही घरं फक्त महाराष्ट्रातील लोकांसाठीच आहेत हेच सांगायला विसरले आणि त्याचे परिणाम आजही महाराष्ट्र आणि मुंबई भोगतेय. या निर्णयामागची पार्श्वभूमी(मिल बंद पडू लागल्यानंतर मुंबईतून बाहेर गेलेल्या मराठी माणसाला पुन्हा मुंबईत आणण्याची) सकारत्मक होती. आज मुंबईला वेगवान शहर(मेट्रो सिटी)म्हणतात. आहेच आमची मुंबई वेगवान! जवळ जवळ एक छोटासा भारत या मुंबईत स्थायिक झाला आहे. या मुंबईचे या भारत देशावर अनंत उपकार आहेत. परंतु आता तर हे परप्रांतीय मराठी माणसाला आणि मराठी भाषेला या मुंबईतूनच बाहेर काढू पाहतायत.
आता वेळ आलीये ती आपण स्वतः कुठे चुकलोय हे जाणून घेण्याची. ज्यावेळी परप्रांतातून मुंबईत माणूस येतो तर तो समूहाने येतो आणि आपल्या समूहातील लोकांना सर्वतोपरी(आपल्याच प्रांतातील व्यक्ती कडून वस्तू खरेदी करणे, अडीअडचणीला मदत करणे वगैरे) प्रयत्न करतो. परंतु आपली मराठी माणसे दोन रुपयाने वस्तू स्वस्त मिळतात म्हणून मराठी माणसाकडून खरेदी करण्याऐवजी परप्रांतीयांकडून खरेदी करतात. आणि वरून मराठी माणूस धंद्यात अपयशी ठरतो अशी दवंडी देखील पिटतात. आपल्या पाल्ल्याला इंग्रजी येण्यासाठी(स्वतः निरक्षर असले तरी) इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालतात. इंग्रजी माध्यमाच्या शाळेत सर्वधर्मीय विद्यार्थी असल्याने तिथे इंग्रजीचं ज्ञानार्जन करण्यासाठी हिंदीची मदत घेतली जाते. आणि आपले पालकही आपल्या मुलाला कुणी हसायला नको म्हणून घरी देखील त्याच्याशी (परिणामी निरक्षर असल्याने इंग्रजी येत नसल्याने/ साक्षर असूनही ) हिंदीतूनच संवाद साधताना दिसतात. आपल्या मातृभाषेत बोलण्याची आज प्रत्येकाला लाज वाटू लागली आहे. इतपत की सार्वजनिक ठिकाणी दोन मराठी माणसं भेटली की हिंदीत संवाद साधताना दिसतात. काय म्हणे मराठीत बोलल्याने चार लोकांत छबी कमी होते. अशी लोकं जेव्हा हिंदी ही राष्ट्रभाषा आहे असं अभिमानाने सांगतात अशावेळी या नतध्रष्टांच्या दोन सणसणीत वाजवाव्याशा वाटतात. आपल्या पोरांना संयुक्त महाराष्ट्राचा इतिहासच माहीत नाही कारण जागतिक क्रांत्या तसेच भारताच्या स्वातंत्र्यलढ्यासारखा तो शाळांमधून सविस्तर कधी शिकवलाच गेला नाही.(हेही खरंतर राष्ट्रीय पक्षाची सत्ता राज्यात असल्यामुळे दिल्लीकरांना खुश करण्यासाठीचं एक धोरणच म्हणावं लागेल.) आपल्या मातृभूमीचा इतिहास आपण आपल्या पोराटोरांना सांगितला नाही शिकवला नाही तर उत्तर प्रदेश आणि बिहारचे सरकार शिकवणार आहे का?यासगळ्याचेच परिणाम म्हणून महाविद्यालयीन शिक्षण घेताना आपली मुलं मराठी ऐवजी हिंदीत बोलण्याला प्राधान्य देतात. हिंदीत बोलण्याला तथाकथित swag समजतात. आज राज्यातल्या साठ टक्के विद्यार्थ्यांना मराठी साहित्य आणि साहित्यकारच माहीत नाहीत.
मराठी मनोरंजन क्षेत्राबाबत बोलायचं झालं तर तेही मराठी राहिलं नसून परभाषीच झालं आहे. सर्रास मराठी पुरस्कार सोहळ्यामध्ये हिंदी गाण्यांवर नायक आणि नायिका नृत्य करताना दिसतात आणि आपणच त्यांना इतकं डोक्यावर(हिंदी गाण्यांवर नृत्य केल्यामुळे खरंतर) घेतलं की भोजपुरी गाण्यांवर नाचण्याइतपत त्यांची हिम्मत वाढली. हिंदीतल्या सिनेमासारखा दर्जेदार, व्यावसायिक मराठी सिनेमा किती दिग्दर्शक देतात. मराठी सिनेमाने फक्त बुद्धिजीवीच कधीपर्यंत राहावं. मुंबई, पुण्यातल्या व्यावसायिक रेडिओ कंपन्यांनी तर मराठी जाणूनबुजून नाकारली आहे. आणि वरून आपलेच दिग्दर्शक, निर्माते, कलाकार ओरडतात की चित्रपटगृह मिळत नाहीत.
या अशा गंभीर परिस्थितीत देखील काही संस्था या मराठीच्या संवर्धनासाठी, तिला व्यवहाराची भाषा बनवण्यासाठी आत्मियतेने झटत आहेत त्यासाठी त्यांचे आभार महाराष्ट्राने मानावे तितके कमीच आहेत. पण एक समाधानाची बाब सांगू तर या सर्व संस्था माय मराठीचा, महाराष्ट्राचा जागर करणं हे त्यांचं आद्य कर्तव्य समजतात. कोणतंही विशेष कार्य केल्यासारखा गाजावाजा करीत नाहीत. रोज सत्ताधार्यांना, मराठी तसेच महाराष्ट्र द्वेष्ट्याना जाब विचारत असतात. नाथाळाच्या माथी काठी हाणण्याचं काम करत असतात.
या लेखात खरं तर मी आपल्या स्वतःला आरसा दाखवण्याचं काम केलंय. काहींना हा लेख फक्त नकारात्मक वाटू शकतो पण जोपर्यंत आपण आपल्यातल्या प्रकर्षाने जाणवणाऱ्या चूका स्वतःला सांगितल्या नाही तोपर्यंत आपण आपल्या भाषेविषयी, संस्कृतीविषयी जागरूक होणार नाही. आज खरं तर अनेक जणांचा महाराष्ट्र दिन फक्त whats app आणि facebook च्या स्टेटस पुरताच मर्यादित असेल परंतु अशांना मला आवर्जून सांगावंसं वाटतं की या महाराष्ट्र दिनाला इथुन पुढे संवादाची, व्यवहाराची भाषा फक्त मराठी केलीत तर या महाराष्ट्र उभारणीत आपला खारीचा नव्हे तर सिंहाचा वाटा असणार आहे. आणि हो जाता जाता एक गोष्ट आवर्जून सांगतो दुर्दैवाने आलेल्या या कोरोना महामारीत आपल्या मराठी जनांसाठी काही सकारात्मक बाब असेल तर परप्रांतीय त्यांच्या राज्यात परत जात आहेत. तर आपल्या बेरोजगार मुलांसाठी व्यवसाय करण्याची ही सुवर्ण संधी आहे ती गमावू नये एवढंच मनापासून वाटतं. १०६ हुतात्म्यांना त्यांच्या बलिदानासाठी भावपूर्ण श्रद्धांजली… जय मराठी! जय महाराष्ट्र!
शुभम पाटील..
मराठी माणसाचा पराक्रम आणि महाराष्ट्राचे वैभव यांना जगात कुणीही नाकारू शकत नाही. अवघ्या देशाशी झगडून मराठी माणसाने मुंबई मिळवली. शक्तिशाली केंद्र आणि राज्य दोन्हींनी केलेला कट या मराठी माणसानं हाणून पाडला. १०६ हुतात्म्यांनी मरण पत्करलं ते या महाराष्ट्रासाठीच. प्रचंड संघर्ष करुन महाराष्ट्र स्वबळावर उभा आहे, नुसता उभाचा नाहीतर देशाला मार्गदर्शन करणारा, कित्येक परप्रांतीयांची पोटं भरणारा आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या ताकदीवर आणि मराठी माणसाच्या पराक्रमावर कुणीही संशय करण्याचं कारण नाही. मात्र, ते म्हणतात ना एक जहाज बुडवायला छोटंसं छिद्र पुरेसं आहे. तेच सध्या महाराष्ट्रात होतंय. आपलीच माणसं महाराष्ट्र, मराठी भाषा, मराठी माणूस, मुंबई, कामगार यांना एकमेकांपासून वेगळं करण्याचा कटात कळत – नकळत सहभागी होतायत.
मराठी भाषेला दुय्यम दर्जा देणं आणि हिंदीला सो कॉल्ड स्टॅंडर्ड म्हणणं हे याचं उत्तम उदाहरण आहे. हे सगळं थांबवून मराठीचा वारसा पूढे न्यायला हवा. राज्यभाषा फक्त मराठीच हवी असा कायदा असला तरी त्याचे किती पालन होते? त्यामुळे आपणच स्वतःपासून सुरुवात करुया. मराठी असेल तरंच महाराष्ट्रात मराठी माणसाचं अस्तित्व राहील नाहीतर नकळत कधी आपण दूर फेकले जाऊ हे आपल्यालाच कळणार नाही. परिस्थिती वाईट असली तरी हातातून गेलेली नाही. होऊ दे चर्चा मराठीचीच… होऊ दे जागर मराठीचाच… तीच खरी श्रद्धांजली असेल या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत शहीद झालेल्या १०६ हुतात्म्यांना आणि कित्यके कामगारांच्या संघर्षाला.
जय महाराष्ट्र…
#अक्षय्यनामा