आज राजर्षी शाहू महाराजांचा स्मृतिदिन

अवघे ४८ वर्षांचं अल्पायुष्य लाभलेल्या राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात समाज जीवनाच्या सर्व क्षेत्रात भरीव कार्य केले. क्रीडा, कला, उद्योग, व्यवसाय, शिक्षण, कृषी, सहकार अशा सर्व क्षेत्रात नवे युग निर्माण केले. प्रजेचे कल्याण हाच कारभाराचा अंतिम उद्देश ठेऊन अनेक सामाजिक सुधारणांचा पाया घातला. राज्यकारभार सुरू केल्या नंतर अवघ्या तीन वर्षांनी राज्यात दुष्काळ व प्लेग अशा संकटांना तोंड द्यावे लागले. या दोन्ही संकटांशी त्यांनी यशस्वीपणे मुकाबला केला.

प्लेगसारख्या साथी देवदेवतांच्या कोपामुळे येतात, अशा भ्रामक समजूती त्या काळात लोकांमध्ये होत्या. त्यामुळे शाहू महाराजांनी प्लेगची शास्त्रशुद्ध माहिती देणारी हजारो पत्रके राज्यभर वाटली. गावागावात या पत्रकांचे सार्वजनिक वाचन पाटील – कुळकर्णीं कडून करून घेतले. प्लेगग्रस्त गावात लोकांना गावाबाहेर काढून त्यांना झोपड्या बांधून दिल्या. कोल्हापूर सारखे राजधानीचे शहर संपूर्ण रिकामे करावे लागले होते. अशा लाखो लोकांच्या राहण्याची व खाण्यापिण्याची व्यवस्था हे कार्य महा-प्रचंड असेच म्हणावे लागेल. उच्च शिक्षित सत्यशोधक नेते भास्करराव जाधव यांची प्लेग कमिशनर म्हणून नेमणूक केली होती.
याशिवाय संस्थानात अनेक ठिकाणी प्लेगच्या रुग्णांवर उपचार व्हावे म्हणून सुसज्ज दवाखाने उभे केले होते. प्रवाशांकडून प्लेगचा फैलाव होऊ नये म्हणून ठिकठिकाणी क्वारंटाईन कॅम्प स्थापन केले होते.

भारतातील पहिला होमिओपॅथी दवाखाना:

प्लेगच्या आजारावर या अँलोपॅथीमध्ये औषध उपलब्ध नव्हती. परंतु होमिओपॅथीमध्ये त्यावर प्रभावी औषध असल्याचे शाहू महाराजांना समजताच त्यांनी डॉ.धोंडोपंत बोरकर या दरबारच्या डॉक्टरांकडून लोकांना ठिकठिकाणी होमिओपॅथी उपचाराची सोय उपलब्ध करून दिली. सन १८१८ साली कोल्हापूरातीलच नव्हे तर देशातील पहिला होमिओपॅथी सार्वजनिक दवाखाना कोल्हापूर येथे सुरू झाला.

आज जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राजर्षी शाहू महाराजांच्या या आगळ्या वेगळ्या योगदानाचे स्मरण क्रमप्राप्त ठरते…
त्यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने राजर्षी शाहू महाराजांना विनम्र अभिवादन..

-कैलास वडघुले.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा