लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज १०० वी पुण्यतिथी

मुंबई, १ ऑगस्ट २०२०:

(२३ जुलै १८५६ – १ ऑगस्ट १९२०) अखेरचा दिवस……

ऑगस्ट १९२०… ३१ जुलैचे बारा वाजून गेले म्हणून एक ऑगस्ट म्हणायचे एवढेच , पण संध्याकाळपासूनच लोक सरदार गृहाखाली जमू लागले होते… रस्त्यावर मुंगी शिरायलाही जागा नव्हती, साऱ्यांचे लक्ष सरदार गृहाच्या तिसऱ्या माळयाकडे लागलेले… डोईवर धोधो पाऊस कोसळतोय, पण गर्दी काही ढिम्म हलत नव्हती… आठवडाभर हिवतापाने आजारी असलेल्या टिळकांची तब्येत बळावली असून आता पुढे काय होणार याची चिंता प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होती. रात्री १० नंतर तर गर्दी अलोट या शब्दालाही लाजवू लागली… कुठे प्रार्थना, जपमाळ, चर्चा आणि बरेच काही सुरु होते… अखेर १२ वाजून २४ मिनिटांनी जी बातमी येऊ नये म्हणून सारेजण खाली उभे होते ती बातमी तिसऱ्या मजल्यावरून खाली आली आणि अलम दुनियेत अक्षरश: वाऱ्यासारखी पसरली…

टिळक गेले……..!

त्याच दिवशी गांधीजींनी मुंबईतच असहकाराची घोषणा केली. आचार्य अत्र्यांनी या दिवसाचे वर्णन करताना म्हटले आहे की, ‘ भारतीय इतिहासातील टिळक युगाचा आणि गांधी युगाचा हा एक महान संधीकाल आहे.’ देशाच्या राजकीय मंचावरून ज्या दिवशी टिळकांनी एक्झिट घेतली त्याच दिवशी गांधीजीनी खऱ्या अर्थाने एंट्री घेतली होती. स्वातंत्र्याची मशाल पुढील पिढीकडे सोपवून लोकमान्य अनंताकडे निघून गेले.

मुंबईतील सर्वात मोठी अंत्ययात्रा

आज जेथे लोकमान्यांचा पुतळा आहे त्याच सरदार गृहाच्या गॅलरीत, सकाळी सहाच्या सुमारास त्यांचा मृतदेह अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला. अंत्यदर्शनाला येणाऱ्या माणसांची गर्दी काही केल्या थांबत नव्हती. अखेर दुपारी दोन वाजता अंत्ययात्रा सुरू झाली. शहरात अघोषित बंद होता.

सारी दुकाने, व्यवहार बंद होते. रस्ते माणसांनी भरून गेले होते. गिरगाव चौपाटीवर अंत्यविधी होणारे टिळक हे एकमेव नेते. तसेच त्यांचा मृतदेह मुद्दाम सर्वाना दर्शन होईल असा खुर्चीत बसवून नेण्यात आला. रस्त्याच्या दुतर्फा, गॅलरीमधून, झाडांवर उभे राहून माणसे अंत्यदर्शन घेत होती. अखेर पाच तासानंतर लाखो माणसांसोबत ही अंत्ययात्रा संध्याकाळी सातच्या सुमारास चौपाटीवर पोहचली. तेथे त्या गर्दीत आणखी भर पडली.

जिकडेतिकडे माणसं, माणसं आणि फक्त माणसंच. अशा अलोट गर्दीत टिळकांना अग्नी देण्यात आला आणि लोकमान्य नावाचे चैतन्य इतिहासाच्या पानात विलीन झाले.

संकलन : सोशल मिडिया

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा