पुणे, १९ मार्च २०२३: ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघाला आता वनडे मालिकाही जिंकण्याची संधी आहे. दोन्ही देशांमधील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला शुक्रवारपासून सुरुवात झाली. मालिकेतील पहिला सामना मुंबईत खेळला गेला, जो भारताने पाच विकेट्सने जिंकला. यावेळी यजमान देश १-० ने पुढं आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना आज (१९ मार्च) रोजी विशाखापट्टणम येथील डॉ. वायएस राजशेखर रेड्डी ACA-VDCA क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल. विशाखापट्टणममध्येही टीम इंडिया जिंकली तर ही मालिकाही भारताच्या नावावर होईल. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया मालिकेत बरोबरी साधण्याचा प्रयत्न करेल.
पहिल्या वनडेत टीम इंडियाच्या गोलंदाजांनी जबरदस्त खेळ दाखवला. मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी या दोघांनी ३-३ विकेट घेतल्या. १८८ धावांचा पाठलाग करताना यजमानांची सुरुवात खराब झाली. संघाचे टॉप ऑर्डरचे फलंदाज फ्लॉप ठरले. केएल राहुलने रवींद्र जडेजासोबत संघाचा विजय निश्चित केला. बऱ्याच कालावधीनंतर राहुलच्या बॅटमधून अर्धशतक झळकलं.
या सामन्यात भारतासाठी एक चांगली गोष्ट म्हणजे त्याचा नियमित कर्णधार रोहित शर्मा पुनरागमन करेल. भावाच्या लग्नात हजेरी लावल्यामुळं तो पहिला वनडे खेळू शकला नाही आणि त्यामुळं हार्दिक पांड्याने कर्णधारपदाची धुरा सांभाळली. त्याच्या आगमनाने संघाच्या प्लेइंग-११ मध्येही बदल झालाय.
मात्र, या सगळ्यात दोन्ही संघांची नजर पावसाकडं असणार आहे. विशाखापट्टणममध्ये हवामानाची स्थिती चांगली नाही. हवामान खात्याने सामन्याच्या दिवशी पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान खात्यानुसार, सामन्याच्या दिवशी ३१ ते ५१ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. सायंकाळी पाच वाजता पाऊस पडू शकतो. अशा परिस्थितीत सामना पूर्ण होतो की नाही हेही पाहावं लागेल.
संघ:
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल (यष्टीरक्षक), इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, जयदेव उनाडकट.
ऑस्ट्रेलिया : स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, मार्नस लॅबुशेन, मिचेल मार्श, मार्कस स्टॉइनिस, अॅलेक्स कॅरी, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, जोश इंग्लिस, शॉन अॅबॉट, अॅश्टन अगर, मिचेल स्टार्क, नॅथन एलिस, अॅडम झाम्पा.
न्यूज अनकट प्रतिनिधी: सूरज गायकवाड