१९८३ च्या विश्वचषक विजयाला आज ४० वर्षे पूर्ण

पुणे २५ जून २०२३: आज २५ जूनला क्रिकेटच्या विश्वचषक अंतिम विजयाला ४० वर्षे पूर्ण होत आहेत. २५ जून १९८३ ला इंग्लंडच्या लॉर्ड्स ग्राउंडवर, भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात विश्वचषक अंतिम सामना झाला. पहिल्या डावात अवघ्या १८३ धावा करून टीम इंडिया ऑलआऊट झाली. वेस्ट इंडिजविरुद्धच्या अंतिम सामन्यात एवढ्या कमी लक्ष्याचा बचाव करणे जवळपास अशक्य होते, पण टीम इंडियाने ते करून दाखवले. आणि आजचा हा दिवस भारतीय इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिला गेला.

लंडनमधील ऐतिहासिक लॉर्ड्स मैदान वेस्ट इंडिज आणि भारताच्या प्रेक्षकांनी खचाखच भरले होते. वेस्ट इंडिजला दोनदा विश्वचषक जिंकून देणाऱ्या क्लाईव्ह लॉईडने भारताचा कर्णधार कपिल देवविरुद्ध नाणेफेक जिंकली. लॉर्ड्सच्या गवताळ खेळपट्टीवर प्रथम गोलंदाजी करताना लॉईडला कोणतीही अडचण आली नाही. टीम इंडिया अवघ्या १८३ च धावा करू शकली.

पुढे फलंदाजी करताना एकेवेळी ५०/१ धावांवर खेळणाऱ्या विंडीज संघाची धावसंख्या ७६ धावांत ६ विकेट्स अशी दयनीय झाली होती. कर्णधार लॉयड ८, लॅरी गोम्स ५ आणि फाऊड बॅचस ८ धावा करून बाद झाले. हेन्स, रिचर्ड्सनंतर मदन लालने गोम्सची विकेट घेतली, तर रॉजर बिन्नीने कर्णधाराला झेलबाद केले. पण ६ विकेट्स गमावल्यानंतर, विंडीजचा यष्टीरक्षक जेफ डुजोनने गोलंदाज मार्शलची साथ घेतली. दोघांनी संघाची धावसंख्या १०० च्या पुढे नेली आणि ४३ धावांची भागीदारी केली. आणि त्यानंतर अमरनाथने मॅच विनिंग स्पेल टाकला व भारताच्या विश्वविजयावर शिक्कामोर्तब झाले.

उपविजेता वेस्ट इंडिजचा कर्णधार क्लाईव्ह लॉईडने सामन्यानंतर सांगितले की, टीम इंडियाने या फायनलमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली आहे. या विजयामुळे देशातील त्यांच्या खेळाडूंना प्रेरणा मिळेल आणि संघ भविष्यातही चांगले क्रिकेट खेळेल. असो, टीम इंडिया आज जागतिक क्रिकेटमधील अव्वल देशांपैकी एक आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा