नवी दिल्ली: शुक्रवारी संध्याकाळी फ्लोर टेस्ट होण्यापूर्वी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ राजीनामा देऊ शकतात. कमलनाथ हे दुपारी पुकारलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर करु शकतात. कॉंग्रेस नेते दिग्विजय सिंह म्हणतात की २२ आमदारांच्या राजीनाम्यानंतर कमलनाथ सरकारकडे बहुमत नाही, अशा परिस्थितीत काय होईल.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कमलनाथ सरकारने शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करावे लागेल. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने या संदर्भातील निर्णय दिला. न्यायमूर्ती हेमंत गुप्ता यांचाही या खंडपीठात समावेश होता. कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकार बहुमत सिद्ध करण्यासाठी विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जात असेल, तेव्हाच्या सर्व प्रक्रियेचे व्हिडीओ चित्रीकरण करण्याचे आणि शक्य असल्यास बहुमत चाचणीचे थेट प्रसारण करण्याचेही आदेशही खंडपीठाने दिले आहेत.
परंतु या अगोदर कॉंग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी एक वृत्त वाहिनिशी बोलताना बहुमताच्या आकड्यावर शंका व्यक्त केली. कॉंग्रेस नेते म्हणाले की, २२ आमदारांच्या राजीनाम्यानंतर कमलनाथ सरकारकडे संख्या नाही. दिग्विजय सिंह म्हणाले की पैशाच्या आणि ताकदीच्या बळावर बहुमताचे सरकार अल्पसंख्याकात आणले गेले आहे.
कर्नाटकातील बेंगळुरू येथे असलेल्या १६ बंडखोर आमदारांना बहुमत चाचणीसाठी पोहोचताना आवश्यक ती सर्व सुरक्षा व्यवस्था पुरविण्याचे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटक आणि मध्य प्रदेश सरकारच्या पोलिस प्रमुखांना दिले आहेत. विधानसभेमध्ये बहुमत चाचणी हा एकमेव कार्यक्रम पार पडेल, इतर कोणताही विषय तसेच मुद्दा चर्चेला येणार नाही, असेही कोर्टाने स्पष्ट केले आहे.