आजच्या लेखकांनी सामाजिक प्रश्‍नांवर रोखठोक आणि सडेतोड बोलून लोकमानस घडविणारी ‘लोकनिती’ निर्माण करावी- प्रा.नितीन बानगुडे-पाटील

फलटण, सातारा २५ नोव्हेंबर २०२३ : ‘‘‘राजनिती’ आणि ‘लोकनिती’ या संकल्पना परस्परविरोधी आहेत. मुठभर शासक राजसत्तेच्यादृष्टीनं बहुसंख्य लोकांचं जगणं घडवण्याचा प्रयत्न करतात ही ‘राजनिती’ असते. तर लोकांनी लोकांसाठी चालवलेली सत्ता ही ‘लोकनिती’ असते. छत्रपती शिवाजी महाराजांनी याच ‘लोकनिती’ला ‘स्वराज्य’ हे नाव दिलं होतं. आज आपल्या प्रजासत्ताक देशाची ‘लोकशाही’ ‘लोकनिती’ म्हणून चालत नसून ‘पक्षशाही’ किंवा ‘प्रतिनिधीशाही’ म्हणून काम करत आहे. आज अवती-भोवती दिसणार्‍या सगळ्या प्रश्‍नांचे मूळ याच ‘राजनिती’त आहे. त्यामुळे आजच्या लेखकांनी सामाजिक प्रश्‍नांवर रोखठोक आणि सडेतोड बोलून आपल्या साहित्यातून लोकमानस घडविणारी ‘लोकनिती’ निर्माण करण्याचे काम करावे’’, असे मत इतिहास अभ्यासक तथा प्रसिद्ध व्याख्याते प्रा.नितीन बानगुडे – पाटील यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र साहित्य परिषद फलटण शाखा, श्री सद्गुरु प्रतिष्ठान व श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ११ व्या स्व.यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलनात अध्यक्षस्थानावरुन प्रा.बानगुडे – पाटील बोलत होते. यावेळी फेडरेशन ऑफ मल्टिस्टेट को – ऑप. क्रेडिट सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष सुरेश वाबळे, जेष्ठ साहित्यिक डॉ.राजेंद्र माने, एरंडोल नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा ‘पुस्तक बगीचा’ प्रकल्पाचे संकल्पक विकास नवाळे, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे विश्‍वस्त विनोद कुलकर्णी, सद्गुरु व महाराजा उद्योग समूहाचे प्रमुख तथा संमेलन स्वागताध्यक्ष दिलीपसिंह भोसले, श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव तथा संमेलन कार्याध्यक्ष डॉ. सचिन सूर्यवंशी – बेडके, म.सा.प. फलटण शाखा अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ, स्वयंसिद्धा संस्था समूहाच्या प्रमुख अ‍ॅड.सौ.मधुबाला भोसले, महाराजा मल्टीस्टेटचे व्हाईस चेअरमन रणजितसिंह भोसले आदींची प्रमुख उपस्थिती होती.

प्रा.बानगुडे – पाटील पुढे म्हणाले, ‘‘साहित्य मन घडवते, इतिहास सांगते, भविष्य घडवण्यासाठी प्रेरित करते, मात्र आजच्या साहित्यिकांची नेमकी भूमिका काय? यावर चिंतन होणे आवश्यक आहे. कागदावर आडवं लिहीलं म्हणजे कथा होते आणि कागदावर उभं लिहिलं म्हणजे कविता होते यातून बाहेर पडून जे काळजातून येते ते ‘साहित्य’ ही गोष्ट सर्वसामान्यांच्या मनात निर्माण व्हायला हवी. साहित्य संमेलने ही केवळ साहित्यिकांसाठी नको तर सर्वसामान्य माणसांसाठी व्हावीत. उत्तम साहित्यिक घडले पाहिजे हे जसे साहित्य संस्थांचे ध्येय असते त्याप्रमाणे उत्तम वाचक, रसिक घडले पाहिजेत हे देखील ध्येय इथून पुढे ठेवावे लागेल. मनं घडविण्याचं, अभिरुची निर्माण करायचं काम साहित्यिकांनाच करावं लागेल’’, असे सांगून ‘‘यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्राचं साहित्यिक आणि सांस्कृतिक मन जागं केल. त्यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर नवसाहित्य, ज्ञानकोष निर्मितीसाठी राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मराठी विश्‍वकोष मंडळाची स्थापना केली. त्यामुळे आज महाराष्ट्राचं साहित्य विश्‍व समृद्ध दिसण्याचे कारण यशवंतराव चव्हाण हे आहेत. त्यांच्या नावे फलटणला सुरु असलेले हे साहित्य संमेलन अभिमानाची बाब आहे,’’ असेही प्रा.बानगुडे – पाटील यांनी यावेळी सांगितले.

पुरस्काराला उत्तर देताना सुरेश वाबळे म्हणाले, ‘‘सहकारी संस्था व्यवस्थित चालत नाहीत परंतु तीच संस्था खाजगी झाल्यावर उत्तम चालते. इथे कुठे तरी आपल्याला विचार करावा लागणार आहे. आपण सर्वांनी अर्थ साक्षर होणे गरजेचे आहे’’. विकास नवाळे म्हणाले, ‘‘ एरंडोल, जि.जळगांव येथे पुस्तक बगीचा उभारल्यानंतर गावातील मोबाईलमध्ये डोकं घालून बसणारी पोरं आज पुस्तकात डोकं घालून बसत आहेत. लहान मुले तिथे येत आहेत; ती पुस्तकं वाचत नसली तरी ती चाळत आहेत. आगामी काळात त्यांनी एक जरी पुस्तक वाचलं तरी आमचा उपक्रम यशस्वी ठरेल.’’ विनोद कुलकर्णी म्हणाले, ‘‘ महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाहूपुरी शाखा ही रवींद्र बेडकिहाळ यांच्यामुळे स्थापन झाली. जर त्यावेळी त्यांनी परवानगी दिली नसती तर नक्कीच आज सातार्‍यात साहित्य चळवळ बघायला मिळाली नसती. सातारा जिल्ह्यामध्ये साहित्य चळवळ टिकवण्यासाठी व वाढवण्यासाठी रवींद्र बेडकिहाळ यांचेच मोठे योगदान आहे.’’

रविंद्र बेडकिहाळ म्हणाले, ‘‘फलटण तालुक्याला साहित्याची एक आगळी वेगळी परंपरा आहे. फलटणचे अधिपती स्व. श्रीमंत मालोजीराजे यांनी साहित्य व संस्कृतीला नेहमीच प्रोत्साहन दिले.’’ दिलीपसिंह भोसले म्हणाले, ‘‘ स्व. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्रासाठी दिलेले योगदान कधीही विसरता येणार नाही. स्व. यशवंतराव चव्हाण यांच्यासारखे नेते आज संपूर्ण देशामध्ये बघायला सुद्धा मिळत नाही; ही मोठी खंत आहे.’’ सचिन सूर्यवंशी – बेडके म्हणाले, ‘‘ स्व. यशवंतराव चव्हाण हे जर राजकारणात आले नसते तर ते उत्कृष्ट साहित्यिक असते. महाराष्ट्र एक चांगल्या साहित्यिकाला मुकला; असे मत राज्यातील अनेक जेष्ठ व श्रेष्ठ मंडळीनी व्यक्त केले आहे’’.

प्रारंभी दीपप्रज्वलन व स्व.यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करुन संमेलनाचा शुभारंभ करण्यात आला. श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुभाषराव सूर्यवंशी – बेडके आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते सुरेश वाबळे यांना महाराजा मल्टीस्टेट पुरस्कृत ‘यशवंतराव चव्हाण सहकार गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. पुस्तक बगीचा’ प्रकल्पाचे संकल्पक विकास नवाळे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ.राजेंद्र माने, म.सा.प.सातारा जिल्हा प्रतिनिधी विनोद कुलकर्णी यांचाही मानपत्र देवून विशेष सन्मान यावेळी संपन्न झाला. म.सा.प. फलटण शाखेच्यावतीने फलटण तालुक्यातील साहित्यिकांची माहिती देणार्‍या ‘साहित्यिक सूची’चे प्रकाशन संमेलनाच्या निमित्ताने करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.दिपाली निंबाळकर यांनी केले. आभार प्राचार्य सुनिल थोरात यांनी मानले. प्रमुख अतिथींचा परिचय प्राचार्य रविंद्र येवले, महादेवराव गुंजवटे, संदीप जगताप, ताराचंद्र आवळे, अमर शेंडे यांनी केला. संमेलनास फलटण शहरातील सामाजिक, शैक्षणिक, सहकार, राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

न्युज अनकट प्रतिनीधी : आनंद पवार

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा