अमरावती, ७ ऑगस्ट २०२३ : शेतकरी अठराविश्व कायमच दारिद्र्याचे जीवन जगत आपला संसाराचा गाडा हाकत आला आहे. परंतु शेतीमध्ये कुठल्या पिकाला कधी बाजार मिळेल हे सांगता येत नाही. अशाच एका शेतकऱ्याला टोमॅटोच्या पिकाने मालामाल केले आहे. आता अमरावती जिल्ह्यातील एका शेतकऱ्याचे त्या भागात सगळे कौतुक करीत आहे. विशेष म्हणजे त्या शेतकऱ्याने १०० दिवसात दोन एकर शेतीमधून लाखो रुपयांची कमाई केली आहे. आधुनिक पद्धतीने शेती केल्यामुळे हे सगळे शक्य झाले आहे.अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील शेतकरी प्रदीप बंड यांनी टोमॅटोचे पीक आधुनिक पद्धतीने घेतले आहे. दोन एकर असलेल्या शेतीमध्ये कमी खर्चात त्यांनी चांगले उत्पन्न घेतले आहे.
प्रदीप बंड यांनी टोमॅटोच्या रोपांची लागवड केली. त्यानंतर त्यांनी सुरुवातीच्या काळात पिकांची दिवसरात्र पाहणी करत निगा राखली. शेतात झिकझॅक पद्धतीने मल्चिंग टाकून टोमॅटोच्या रोपांची लागवड केली. ५ फूट बाय २ बेड अशा पद्धतीने साधारणत: दीड फूट अंतरावर दोन रोपांची लागवड केली. तसेच ठिबक सिंचन पद्धतीने पाण्याचे व खताचे नियोजन केले.
सध्या त्यांच्या शेतात चांगल्या प्रकारचे टोमॅटो पीक आहे. त्याचबरोबर टोमॅटोला चांगला बाजारभाव मिळत असल्याने त्यांना लाखो रुपयांचा फायदा झाला आहे. चांदुर बाजार, अमरावती परतवाडा, या बाजारपेठेमध्ये त्यांच्या टोमॅटोला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. सध्या ६५० ते १५०० रूपये प्रति कॅरेट भाव असल्याने त्यांना जास्त फायदा झाला आहे. अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या पिकाला बाजारात भाव मिळाला, तर कुठलाही शेतकरी कधीच आत्महत्या करणार नाही.
बी-बियाणे, मजुरी, फवारणी, खत, टोमॅटोच्या झाडांची बांधणी, फळे तोडणे यासाठी शेतकरी प्रदीप बंड यांचे जवळपास दोन लाख रुपये खर्च झाले आहेत. त्याच्यापेक्षा शेतकऱ्याला जास्त पैसे टोमॅटोच्या विक्रीतून मिळाले आहेत.मागील काही दिवसांपासून सर्वत्र टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सामान्यांच्या ताटातून टोमॅटो हद्दपार झाला आहे. ज्यावेळी बाजारात टोमॅटोची बाजारात आवक वाढेल त्याचवेळी टोमॅटोचे दर कमी होतील असे बंड म्हणाले.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर