टोमॅटोचा भाव १०० रुपये किलोच्या पुढे, एका महिन्यात २० पट दरवाढ

नवी दिल्ली २७ जून २०२३: देशातील काही भाग तीव्र उष्णतेने त्रस्त आहेत, तर अनेक राज्यात पावसामुळे टोमॅटो पिकाचे नुकसान झालय. त्यामुळे टोमॅटो उत्पादनात मोठी घट झालीय. शेजारील राज्यांतून टोमॅटोचा पुरेसा पुरवठाही होत नाही. अशातच देशातील बहुतांश बाजारपेठेत टोमॅटोचा भाव १०० रुपये किलोच्या पुढे गेला आहे. घाऊक बाजारात टोमॅटो ६५ ते ७० रुपये किलोने विकला जात आहे. आठवडाभरापूर्वी घाऊक बाजारात टोमॅटो ३० ते ३५ रुपये किलोने विकला जात होता. किरकोळ बाजारात त्याची किंमत ४० ते ५० रुपये प्रति किलो होती. म्हणजेच किमती जवळपास दुपटीने वाढल्या आहेत.

महिनाभरापूर्वी म्हणजेच मे महिन्यात उत्तर प्रदेश, महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये टोमॅटो २ ते ५ रुपये किलोने विकला जात होता. म्हणजेच अवघ्या एका महिन्यात टोमॅटोचे भाव १९००% टक्क्यांनी वाढले आहेत. दिल्लीचे व्यापारी सांगतात की, आठवडाभरात टोमॅटोचे दर दुपटीने वाढले आहेत. हरियाणा आणि उत्तर प्रदेशातून टोमॅटोचा तुटक पुरवठा होत आहे. टोमॅटोचा पुरवठा करण्यासाठी इतर राज्यांतून टोमॅटो आणले जात असल्याने वाहतूक खर्चही वाढला आहे.

मध्य प्रदेशच्या बाजारात टोमॅटो ८० ते १०० रुपये, उत्तर प्रदेशात ८० ते १०० रुपये, दिल्लीत टोमॅटो ७० ते १०० रुपये राजस्थानमध्ये ९० ते ११० रुपये आणि पंजाबमध्ये ६० ते ८० रुपये किलोने विकले जात आहेत. २०२१-२२ मध्ये भारतात २० दशलक्ष टनांहून अधिक टोमॅटोचे उत्पादन झाले. येथे प्रामुख्याने टोमॅटोचे दोन प्रकार घेतले जातात. संकरित आणि स्थानिक. मध्य प्रदेश हे देशातील सर्वात मोठे टोमॅटो उत्पादक राज्य आहे. यानंतर आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, ओडिशा आणि गुजरात ही टोमॅटो उत्पादक राज्ये आहेत.

थोड्या कालावधीतच टोमॅटोचे नवीन पीक आल्यावर, अंदाजे १ ते २ महिन्यात भाव खाली येण्याची शक्यता आहे. तमिळनाडू कृषी विद्यापीठाच्या मते, जेव्हा टोमॅटोची झाडे तीन महिन्यांची होतात, तेव्हा ते आठवड्यातून दोनदा टोमॅटो तोडू शकतात. ही झाडे १-२ महिन्यांच्या कालावधीसाठी पीक देतात. पण ते तेथील माती आणि हवामान परिस्थितीवर अवलंबून असते.

महाराष्ट्रातील शेतकरी सांगतात की, मे महिन्यात टोमॅटोचे भाव दोन रुपये किलोपर्यंत खाली आले होते. योग्य भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांनी पिकात कीटकनाशके व खतांचा वापर केला नाही. त्यामुळे पिकावर रोगांचा प्रादुर्भाव वाढून उत्पादनात घट झाली. त्यामुळे भाव वाढले आहेत. गुजरात आणि महाराष्ट्र हे टोमॅटो उत्पादक राज्यांमध्ये आघाडीवर आहेत पण गुजरातमधील टोमॅटोच्या भाव वाढीवर व उत्पादनावर चक्रीवादळाचा परिणाम दिसून आला.

न्युज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा