‘अति घाई’ माणसाला संकटात नेई..

4

अखेर पुन्हा एकदा सोलापूर,कोल्हापूर, सांगली, ठाणे, पुणे शहर, ग्रामीण भाग कोरोना कहरमय झालय. ही वेळ कुणामुळे आली? का आली? घाई करण्यामुळेचना? घराबाहेर पडाच. भाज्या कुठे मिळताहेत, मांस-मच्छी कुठे मिळते, फळे बघा आहेत का, धक्के देत ठाण्याचा जांभळी नाका व पुण्याची गुलटेकडी गजबजली जात असेल तर ‘कोरोना’ तुमच्या मानगुटीवर बसणारच आहे.
लग्न करण्याची घाई, पोरं जन्माला घालण्याची घाई, त्या पोरांना शाळेत घालण्याची घाई, त्यांची करिअर करण्याची घाई, परदेशात धाडण्याची घाई, मोठ्या पॅकेजची घाई, प्रशस्त मोठ्ठं घर-कार खरेदीची घाई, बँक बॅलेन्स वाढविण्याची घाई. ही घाईची परंपरा थोडी तपासून पहा. अख्खी पिढी भरकटल्याचा प्रत्यय येईल.

पूर्वी विवाह लवकर व्हायचे. संतती १० वर्षांनी झाली तरी काही फरक पडत नव्हता.पूर्वी मुलं ५-६ वर्षे मैदानावर – नदी – डोहावर हुंदडायची मग शाळेत प्रवेश घ्यायची. आज बँका दारात, कर्जाची घाई. पूर्वी ८०-९० नंतरच मरणाचा विचार. आता मरणाचीही घाई. २२-२५ वर्षांची पोरं मोटरसायकल अपघातात मरतात तेव्हा मोटरसायकल घेऊन देणार्‍या मातापित्यांची कीवच येते. घाई… घाई…आणि घाईच!

प्रगतीच्या नांवाखाली ६० दिवसांचे टॉमेटो २२ दिवसांत लाल होवून बाजारात येतात. ३५ दिवसांची कोथिंबीर २० दिवसांत जुडीत विसावते. सायन्सला घाई, खाणार्‍याला घाई अन् पिकविणार्‍यालाही घाईच. म्हणे प्रगती!

एवढी घाई करून शेतकरी सुखी आहे का? शास्त्रज्ञ भारतात न थांबता अमेरिकेत पळतात? मग एखादा कोरोना आला की पुन्हा गावाकडे का पळता? पळण्याचीही घाईच!

सगळीकडे घाई. घाईतच वाचन व घाईतच सेवन आणि जेवणही.
मित्रांनो,ही घाई आज का लिहिली?

स्वतः थोडे बदला.आठ दिवस घरा बाहेर नाही गेला.डाळभात उकडून खाल्लेतर मरण येणार आहे का? घराबाहेर पडता? कोरोना संसर्गामुळे फैलावतो हे माहित असताना सुद्धा स्वतःसह इतरांचा जीव का धोक्यात घालता?

व्यापारी वर्गालाही चाप देणं गरजेचं आहे. गाय छाप तंबाखु १० रुपये. हे मागच्या दाराने ७० रु.ला विकतात. जीवनावश्यक वस्तुुंचा काळाबाजार. श्रीमंत होण्याची घाई. अखेर कोरोना पॉझिटीव्ह झाला. त्या व्यापार्‍याची बायको १८ दिवसात विधवा झाली. मरण्याचीही घाई!

कोरोनाचे पेशंट व त्यांचे अंत्यसंस्कार आपण टी. व्ही. च्या पडद्यावर पाहतो. ज्या बापाने आयुष्यभर कष्ट केलं, दोन वेळचं धड जेवला नाही. त्याचा कोरोनाने घात केला व तिकडेच त्याचे क्रिया कर्म ऊरकले.

घरातूनच घाई!
अहो, ऐकलं का? भाजी आणा अहो, ऐकलं का? किराणा आणा, दुध आणा, फळे आणा, मांस-मटण आणा. ही आणण्याची घाई त्याच्या जीवावर बेतली.

म. गांधी ४२ दिवस उपाशी राहिल्याची नोंद इतिहासात आहे. गांधींचा देश आहे. आपण १२ दिवस डाळरोटी खाऊन जगू शकत नाही का?

मित्रांनो,मरणाची एवढी घाई करू नका.

२०२० हे पैसे कमविण्याचे वर्ष नाही. हे वर्ष आहे स्वतःला जीवंत ठेवण्याचे. जो जीवंत राहिला तिच त्याची खरी प्रॉपर्टी. तेच त्यांचं कौटुंबिक विश्व. घराबाहेर पडू नका. वाचन करा, विनोद करा, नृत्य करा, संगीत ऐका. बायकोची चेष्टा मस्करी करा, पुन्हा तिची मनधरणी करा, उत्तम चहा करायला सांगा. प्रेमाच्या चार गोष्टी बोला. मित्रांना फोन लावा. जुन्या आठवणी ताज्या करा. घाई करू नका. घराबाहेर पडू नका.

आपणास सर्वाना कळकळीची विनंती आहे. जिवन अनमोल आहे.ते घाई घाईने खर्चीपाडू नका.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा