उत्तर प्रदेशमध्ये ट्रॅक्टर ट्रॉली नदीत कोसळली ; १४ ठार, २५ जण जखमी

उत्तरप्रदेश, १५ एप्रिल २०२३: उत्तर प्रदेशमधील शाहजहानपूर जिल्ह्यात आज दुपारी मोठी दुर्घटना घडली. ४२ जणांनी भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली पुलावरून थेट नदी पात्रात कोसळली. या भीषण अपघातात १४ जणांचा जागीच मृत्यू झाला असून, २५ हून अधिक जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेबाबत शाहजहानपूरचे पोलीस अधीक्षक एस. आनंद यांनी सांगितले की, अमजतपूर गावात भागवत कथा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

एका ट्रॅक्टर ट्रॉलीतून ४२ जणांना घेऊन जात असताना चालकांचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर ट्रॉली थेट पुलावरून खाली कोसळली. नदी पात्रात पाणी नसल्याने उंचावरून खाली कोसळल्याने अनेकांचा जागीच मृत्यू झाला. अपघातांची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तत्काळ स्थानिकांच्या मदतीने मदतकार्य सुरू करण्यात आले.

या दुर्घटनेत १४ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. वरिष्ठ अधिकारी या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत. या भीषण दुर्घटनेबाबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना २ लाख रुपयांची तर जखमींना ५० हजारांची मदत देण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा