Traffic congestion in Kiwale: किवळेतील वाहनचालकांना सध्या वाहतूक कोंडीच्या दुष्टचक्रातून मार्ग काढावा लागत आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाच्या सबवे आणि मुकाई चौक परिसरात लावलेल्या लोखंडी अडथळ्यांमुळे वाहनचालकांना १ ते ३ किलोमीटरचा वळसा घालून प्रवास करावा लागत आहे. यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत असून, वेळेचा अपव्यय आणि पैशांचा भुर्दंडही सोसावा लागत आहे.
मुकाई चौकातील वाहतूक कोंडी ठरतेय डोकेदुखी
मुकाई चौकातून रावेत आणि किवळेकडे थेट जाण्यास प्रशासनाने सहा महिन्यांपूर्वी बंदी घातली आहे. परिणामी, देहूरोडकडून येणाऱ्या वाहनचालकांना रावेत आणि किवळेत जाण्यासाठी माळवालेनगरमार्गे १ किलोमीटरचा वळसा घ्यावा लागत आहे. यामुळे प्रवाशांचा प्रवास वेळखाऊ आणि त्रासदायक बनला आहे.
सबवेवरील अडथळ्यांमुळे लांबचा पल्ला
किवळे सबवेजवळ ३ मीटर उंचीचे लोखंडी अडथळे लावल्याने मुंबई, कात्रज, देहूरोड, तळेगाव, किवळे आणि गहुंजेकडे जाणाऱ्या वाहनांना रावेत पुलावरून वळसा घ्यावा लागत आहे. निगडीहून किवळे सिम्बायोसिस विद्यापीठ आणि गहुंजेकडे जाणाऱ्या पीएमपी बसलाही ३ किलोमीटरचा अतिरिक्त प्रवास करावा लागत आहे.
विद्यार्थी आणि नागरिकांचे हाल
या वाहतूक बदलांमुळे विद्यार्थी आणि नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. बस आणि इतर वाहनांना लांबचा वळसा घ्यावा लागत असल्याने विद्यार्थ्यांना वेळेवर महाविद्यालयात पोहोचणे कठीण झाले आहे. तसेच, नागरिकांनाही कामावर पोहोचण्यासाठी अधिक वेळ लागत आहे
प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी
किवळेतील या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. प्रशासनाने तातडीने या समस्येवर उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे