निगडी, २ जानेवारी २०२३ : नवीन वर्षाचे औचित्य साधत घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांमुळं रविवारी (ता. एक) जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर लोणावळ्यातील कार्ला फाटा आणि सोमाटणे फाटा येथे मोटी वाहतूक कोंडी झाली. कार्ला येथे एकवीरा आईचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती; तसेच शिरगाव येथील प्रतिशिर्डी साईबाबांच्या मंदिरात दर्शनासाठी मोठी रांग लागली होती.
रविवारची सुटी, तसेच नवीन वर्षाचे औचित्य साधत पुणे, मुंबई येथील नागरिक घराबाहेर पडले. लोणावळा, कार्ला आणि मावळ परिसरात नागरिकांनी नवीन वर्षाचे सेलिब्रेशन केलं. रविवारीही अनेक नागरिकांनी नववर्षाचा पहिला दिवस चांगला जावा, यासाठी कुटुंबासह लोणावळ्यातील कार्ला येथे एकवीरा आईचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. यामुळे जुना पुणे- मुंबई महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. अशीच परिस्थिती सोमाटणे फाटा टोलनाका येथे पाहायला मिळाली. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यामुळं वाहतूक पोलिसांची चांगलीच धावपळ झाली.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील