नांदगाव, नाशिक ४ नोव्हेंबर २०२३ : कन्नड घाटातील अवजड वाहतूक बंद असल्याने नांदगाव तालुक्यातील जळगाव बुद्रुक फाट्यावरुन व्हाया संभाजीनगर या मार्गाने वाहतूक होत आहे. घाटातील रास्ता अत्यंत खराब असल्याने, तळवाडे कासारी घाटात आज वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. हा घाट अतिशय नादुरुस्त झाला आहे. मोठ मोठे खड्डे व खड्ड्यात फसणारी वाहने यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली आहे.
हा घाट सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असुन साडेतीन किलोमीटरच्या घाटरस्त्याची गेल्या दहा वर्षापासून दुर्दशा झालेली आहे. त्यातच संभाजीनगरकडील कन्नडची अवजड वाहतूक या मार्गाने वळविण्यात आल्याने या भागातील शेतकरी व अन्य ग्रामस्थांची मोठी अडचण झाली आहे. कन्नड घाटातून जाणारी सर्व अवजड वाहने, शिऊर बंगला ते तळवाडे कासारी पासुन न्यायडोंगरीमार्गे वळविण्यात आली आहे.
आज जवळपास आठ तासापासून वाहतूक कोंडी निर्माण होऊन रहदारी बंद पडली. त्यामुळे संभाजीनगर व नांदगाव दरम्यान दोन्ही बाजूला ८ ते ९ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सार्वजनिक बांधकाम विभाग व वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचे वाहनचालकांनी सांगितले आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी देखील या रस्त्याकडे लक्ष द्यावे असे या प्रसंगी बोलले जात आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : नाना आहिरे