Kharadi to Wagholi Traffic Improvement : पुणे शहरात वाहतूक कोंडी ही एक मोठी समस्या आहे. विशेषत: खराडी ते वाघोली दरम्यानचा रस्ता नेहमीच वाहतूक कोंडीने भरलेला असतो. मात्र, पुणे पोलिसांनी केलेल्या प्रभावी उपाययोजनांमुळे या मार्गावरील वाहतूक कोंडी कमी झाली आहे आणि वाहतुकीचा वेग तब्बल १६ ते १९ टक्क्यांनी वाढला आहे.
पोलिसांच्या प्रभावी उपाययोजना
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली अपर आयुक्त मनोज पाटील आणि वाहतूक शाखेचे उपायुक्त अमोल झेंडे यांनी या समस्येवर तोडगा काढण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या. यामध्ये काही राईट टर्न बंद करणे, चौक सुधारणा करणे आणि काही सिग्नल बंद करणे यांसारख्या महत्त्वाच्या बदलांचा समावेश आहे. तसेच, बेशिस्त वाहनचालकांवर कठोर कारवाई करत पोलिसांनी २ कोटी ४८ लाखांचा दंड वसूल केला आहे.
वाहतुकीच्या वेगात लक्षणीय वाढ
या उपाययोजनांमुळे एअरपोर्ट रोडवरील ५०९ चौक ते गुंजन चौक दरम्यानचा सरासरी वेग २८.७ किमी प्रतितासवरून ३९.६ किमी प्रतितास झाला आहे. तसेच, नगर रस्ता केसनंद फाटा ते शास्त्रीनगर चौक आणि शास्त्रीनगर चौक ते केसनंद फाटा या मार्गावरील वाहतुकीच्या वेगातही लक्षणीय वाढ झाली आहे.
काय बदल केले?
- येरवडा, शास्त्रीनगर चौकातील कल्याणी नगरकडे जाणारा राईट टर्न बंद करून यू-टर्न देण्यात आला.
- वडगाव शेरी चौकात पुण्याकडून नगरकडे जाताना राईट टर्न बंद करून अग्निबाज गेटसमोरून यू-टर्न देण्यात आला.
- विमाननगर चौकात (फिनिक्स मॉल) राईट टर्न बंद करून चौक सिग्नल विरहित करण्यात आला.
- खराडी दर्गा चौकातील राईट टर्न बंद करून आपले घर बस स्टॉपपासून यू-टर्न देण्यात आला.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
एटीएमएस या अत्याधुनिक सिग्नल प्रणालीद्वारे वाहतुकीचा प्रवाह पाहून केलेल्या विश्लेषणाद्वारे नगर रोडवरील वाहतुकीचा वेग वाढवण्यात आला आहे.
पुणे पोलिसांच्या या प्रभावी उपाययोजनांमुळे पुणेकरांना वाहतूक कोंडीच्या त्रासातून दिलासा मिळाला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी, सोनाली तांबे