विद्यार्थी स्नेही कायदेतज्ज्ञ भास्करराव आव्हाड यांचे दुःखद निधन

पुणे, दि. २४ जुलै २०२०: इंग्रजी शब्दभांडाराच्या समृद्ध अडगळीत अडकलेले कायदेविषयक शिक्षण सहज सोप्या शब्दात गावखेड्यातील मराठी मुलांना मिळावं यासाठी आयुष्यभर झटणारे बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोव्याचे माजी अध्यक्ष ॲड भास्करराव आव्हाड सर यांचे आज निधन झाले. मृत्यू समयी ते ७७ वर्षांचे होते.

कोरोनावर उपचार चालू असताना, पुण्यात त्यांचा मृत्यू झाला. वकिलांना समाजाभिमुख करणे हे आपले परम ध्येय मानणारे अॅड आव्हाड, वकिलांच्या प्रश्नांना वाचा फोडताना सदैव आघाडीवर असत. प्रथितयश दैनिकात लेखमाला लिहून त्यांनी विविध कायदेविषयक समस्या सरकार आणि समाजासमोर मांडल्या होत्या आणि त्या समस्येवर तोडगा निघेपर्यंत ते आपली बाजू मांडत राहिले.

राज्यातील विद्यार्थी वकील आणि न्यायाधीश यांना मार्गदर्शन करताना ते स्वतःच्या प्रॅक्टीसमध्ये यशस्वीपणे कार्यरत असत. मुंबई उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात त्यांचे अनेक खटले महत्वपूर्ण ठरले होते.

वकिलांशी सतत संवाद साधत राहणं ही वयोमानानुसार कष्टप्रद वाटणारी बाब त्यांना अखेरपर्यंत आनंददायी वाटत होती. त्यामुळे या ही वयात राज्यात कोठेही प्रवास करायची आणि वकील संघटनेला मार्गदर्शन करण्याची त्यांची तयारी असे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा