गोल पोस्ट स्पॉटलाइट ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं दुःखद निधन

ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं दुःखद निधन

सातारा, २२ सप्टेंबर २०२०: मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत अभिराज्य गाजवून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या प्रेमळ व्यक्तिमत्व, ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे ७९ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना साताऱ्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथंच आज सकाळी पावणे पाचच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना काही दिवसांपूर्वी ” काळुबाईच्या नावाने चांगभलं ” या मालिकेच्या चित्रिकरणाच्या वेळी कोरोनाची लागण झाली होती. आशालताबाई यांच्यासह काळूबाईच्या सेटवर काम करणाऱ्या २७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

विशेष म्हणजे मालिकेच्या चित्रीकरणासाठी मुंबईवरून एक डान्स ग्रुप बोलावण्यात आला होता. त्यांच्यामार्फत कोरोनाची लागण झाल्याचं बोललं जात होतं. कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर सोमवारी अचानक त्यांची प्रकृती खालावली. त्यानंतर त्यांना साताऱ्यातील प्रतिभा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं.

आशालता यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात ही कोकणी चित्रपटातून केली होती. आशालता या मूळच्या गोव्याच्या आहेत. हिंदी सिनेसृष्टीतही त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली होती. त्यांनी विविध भाषांतील १०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं होतं. छोट्या पडद्यावरील अनेक टीव्ही मालिकांमध्येही त्या झळकल्या होत्या. संगीत नाटक मत्स्यगंधाच्या माध्यमातून त्यांनी नाटकातील कारर्कीदीस सुरुवात केली.

त्यानंतर ‘गुंतता हृदय हे, रायगडाला जेव्हा जाग येते, चिन्ना आणि महानंदा’ अशा नाटकांमध्ये त्यांनी प्रमुख भूमिका साकारल्या. बासू चटर्जी यांच्या ‘अपने पराये’ या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. याच चित्रपटातील सहायक अभिनेत्रीच्या भूमिकेसाठी त्यांना फिल्म फेअरसाठी उत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचं नामांकनही मिळालं होतं. मराठी चित्रपटसृष्टीत ‘उंबरठा, सूत्रधार, नवरी मिळे नवऱ्याला, वहिनीची माया, माहेरची साडी’ हे त्यांचे गाजलेले चित्रपट होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अंकुश ढावरे

error: Content is protected !!
Exit mobile version