पिकांवर फवारणी करणाऱ्या शेतकरी व शेतमजुरांचे प्रशिक्षण शिबिर संपन्न

बारामती, दि. २ ऑगस्ट २०२०: बारामती तालुक्यातील कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) पुणे व अग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने मका पिकावरील औषधांची फवारणी करणाऱ्या शेतकरी व शेतमजुरांना कौशल्याधारित दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम दिनांक ३१ व ०१ ऑगस्ट दरम्यान जळगाव सुपे येथे पार पडला.

बारामती तालुक्यातील जळगाव सुपे गावातील या प्रशिक्षणाच्या उद्घाटन प्रसंगी उप-प्रकल्प संचालक आत्मा पुणे घाडगे यावेळी म्हणाले पिकांच्या उत्पादन वाढीसाठी निरनिराळे कृषी निविष्ठा, बी बियाणे औषधे इत्यादी शेतकरी वापरतो परंतु ही निविष्ठा वापरताना शेतकरी योग्य ती काळजी न घेतल्यामुळे भरघोस उत्पन्न मिळत नसून नुकसान होत आहे. यासाठी कीटकनाशकांचा, तणनाशकांचा योग्य वापर व हाताळणी करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी कीटकनाशकांचा पिकांवर वारेमाप वापर करणे टाळावे.

बारामती कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे विषय विशेषज्ञ पीक संरक्षण डॉ. मिलिंद जोशी यांनी शेतकऱ्यांना कीटकनाशकांच्या लेबल क्लेम या विषयावर मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांना मका या पिकासाठी कोणकोणत्या प्रकारची औषधे वापरावी व कोणत्या प्रकारचे औषधे वापर करणे टाळावे या विषयी मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनी विविध माहिती पत्रक वाचून त्याप्रमाणे काळजी घ्यावी.

शेतकऱ्यांनी निरनिराळी एकापेक्षा जास्त औषधे एकत्र करून फवारणी टाळावे. कारण असे केल्यामुळे किडींचा बंदोबस्त न होता विविध धोके निर्माण होऊ शकतात. कोणत्या प्रकारच्या औषधांची फवारणी एकत्र करून घेता येते हे देखील डॉ.मिलिंद जोशी यांनी शेतकऱ्यांना सांगितले. तसेच किडीच्या प्रादुर्भावानुसार फवारणी यंत्र व नोझल ची निवड, फवारणी यंत्रे सुट्टे भाग, इंजिन पंप, फवारणी यंत्राची निगा व देखभाल, कीटकनाशकांचा नेमका व सुरक्षित वापर करण्याची पद्धत व याकरिता घ्यावयाची काळजी आणि कीटकनाशक फवारणी सुरक्षिततेची साधने जसे फवारणी ड्रेस, हात मोजे, रुमाल, गॉगल आधी साधने फवारणीच्या वेळी वापरावीत.

तसेच शेतकऱ्यांनी कीटकनाशकांच्या बॉटल पॅकेट वरील निरनिराळे लेबल चिन्ह यांचा अभ्यास करावा या प्रशिक्षणादरम्यान शेतकऱ्यांना सुरक्षित फवारणीचे प्रात्यक्षिकही दाखविण्यात आले बारामतीचे उपविभागीय कृषी अधिकारी श्री.बालाजी ताटे म्हणाले की शेतकऱ्यांनी फवारणी संदर्भात तज्ञांचे म्हणणे ऐकावे त्याचप्रमाणे काळजी घ्यावी व फवारणी औषधे विकत घेताना दुकानदारांना फवारणी सुरक्षिततेची साधने या विषयी माहिती विचारावी. या कार्यक्रमाला परिसरातील ५२ शेतकरी उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा