जम्मू काश्मीर, ७ जानेवारी २०२३ : जम्मू-काश्मीरमध्ये शुक्रवारी २० आयपीएस अधिकाऱ्यांसह ७४ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. याअंतर्गत नवे पोलिस प्रमुख आणि तीन रेंज डीआयजींची नियुक्ती करण्यात आली आहे. गृह विभागाने शुक्रवारी संध्याकाळी जारी केलेल्या दोन स्वतंत्र आदेशांनुसार, १५ उपमहानिरीक्षक (डीआयजी) आणि ५९ पोलिस अधीक्षक (एसपी) यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
वर्ष १९९७ च्या बॅचचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी गरीब दास यांची उधमपूर येथील शेर-ए-काश्मीर पोलिस अकादमी (SKPA) संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आदेशात म्हटले आहे, की आयपीएस अधिकारी रईस मोहम्मद भट यांना दक्षिण काश्मीर रेंजचे नवीन डीआयजी बनविण्यात आले आहे, तर दुसरे आयपीएस विवेक गुप्ता यांची उत्तर काश्मीर रेंजचे डीआयजी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शक्ती पाठक यांना जम्मू-सांबा-कठुआ रेंजचे नवे डीआयजी बनविण्यात आले आहे.
जम्मू-काश्मीर आणि इतर ठिकाणच्या दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी झाल्यामुळे केंद्राने शुक्रवारी पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदशी संलग्न पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट (PAFF) याला प्रतिबंधित संघटना म्हणून घोषित केले. केंद्रीय गृह मंत्रालयाने लष्कर-ए-तैयबाशी संलग्न अरबाज अहमद मीर, जो सध्या पाकिस्तानमध्ये आहे आणि जम्मू-काश्मीरचा रहिवासी आहे, याला दहशतवाद प्रतिबंधक कायदा बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा, १९६७ अंतर्गत दहशतवादी म्हणून घोषित केले आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाने एका अधिसूचनेत म्हटले आहे की, PAFF सुरक्षा दल, राजकीय नेते आणि जम्मू-काश्मीरमध्ये काम करणाऱ्या इतर राज्यांतील नागरिकांना वारंवार धमक्या देत आहे. गेल्या काही महिन्यांपासून काश्मीरमध्ये टार्गेट किलिंगच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड