मुंबई, 15 सप्टेंबर 2021: गेल्या काही दिवसात परिवहन मंत्री अनिल परब आणि त्यांच्या विभागातील भ्रष्टाचारासंदर्भात भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून सातत्याने आरोप लावले जात आहेत. परिवहन विभागातील बदली, पदोन्नतीमध्ये अधिकाऱ्यांच्या संगनमताने अनिल परब यांनी कोट्यवधींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. या बिनबुडाच्या आरोपामुळे जनमानसात आपली प्रतिमा मलिन होत असून, कुटुंबाची नाहक बदनामी होत असल्याचे सांगत अनिल परब यांनी त्यांच्या वकीलामार्फत किरीट सोमय्या यांना तब्बल 100 कोटीच्या मानहानीचा दाव्याची नोटीस (Defamation Suite notice) पाठवली आहे.
ही कायदेशीर नोटीस मिळाल्यानंतर 72 तासाच्या आत सर्व ट्विट डिलीट करण्याचा आणि बिनशर्त माफी (Apologies) मागण्याचा इशारा या नोटीसच्या माध्यमातून देण्यात आला आहे. सोमय्या यांच्या सततच्या बेछुट आरोपांमुळे अनिल परब यांची प्रतिमा मलिन होत असल्याचं देखील नोटीसीत नमूद करण्यात आलं आहे.
अनिल परब हे शिवसेनेचे ज्येष्ठ नते आणि मंत्री आहेत. मेहनत करून त्यांनी समाजात प्रतिष्ठा मिळवली आहे. मात्र किरीट सोमय्या यांच्या निराधार आरोपांमुळे प्रतिमा डागाळत असल्याचा उल्लेख नोटीशीत करण्यात आला आहे. तसेच नोटीशीत काही ट्वीटचा तारखेसह उल्लेख करण्यात आला आहे. आता भाजपा नेते किरीट सोमय्या या नोटीशीला काय उत्तर देतात?, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सोमय्या यांचे आरोप तथ्यहीन असून, परब यांचा प्रत्यक्षात त्याच्याशी काही संबध नाही. त्यामुळे सोमय्या यांनी यापुढे असले आरोप करू नये, आरोपासंदर्भातील जुने ट्विट डिलीट करावे, माफी मागावी. माफीनामा मराठी, इंग्रजी किंवा हिंदी या भाषेतील किमान दोन वृत्तपत्रात प्रकाशित करावा अशी मागणी या नोटीसमध्ये करण्यात आली आहे. नोटीस मिळाल्याच्या 72 तासात नोटीसीतील मागण्या मान्य न केल्यास न्यायालयात 100 कोटींचा मानहानीचा दावा दाखल करु, असा इशारा सुषमा सिंग यांनी दिला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे