तराफ्याचा पंखा मोडल्याने कोयना शिवसागर जलाशयातील वाहतूक सेवा बंद

सातारा ११ डिसेंबर २०२३ : शिवसागर जलाशयामधील कोयना कांदाटी विभागाला जोडणाऱ्या तसेच दोन्ही तीरावर वाहतूक दळणवळणासाठी वापरण्यात येणाऱ्या मोठ्या तराफ्याच्या (बोटीचा) पंखा पाण्यात मोडून पडल्याने जलाशयातील दळणवळण ठप्प झाली आहे. तापोळ्याहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरेगाव तसेच तेटली या भागाकडे तराफ्यातून रोज शेकडो वाहने इकडून तिकडे पोहोचवण्याचं काम होत असते. त्यामुळे तात्काळ जिल्हा परिषदे कडून याची दुरुस्ती व्हावी अशी मागणी येथील स्थानिकांकडून होत आहे.

तापोळा येथून हा तराफा बामणोली करत कांदाटी खोऱ्याची वाट धरतो. या विभागातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गाव दरे त्यानंतर आकल्पे, लामज, कांदाटबन, वलवन आदी गावे करत परत तापोळा असा प्रवास हा तराफा करतो. कोयना, सोळशी व कांदाटी या तीन विभागांना तराफा सेवेचा फायदा मिळतो. जलाशयाचा काठ, तसेच डोंगरावरील सुमारे साठहून अधिक गावांना दळणवळणासाठी तराफा हे एक मुख्य साधन ठरले आहे. बामणोली व तापोळा या बाजारपेठेच्या गावांमध्ये लोकांना शासकीय कामे, बाजार, तसेच शाळा व इतर कामकाजासाठी ये- जा करावी लागते.

सातारा जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातर्फे या तराफ्याची सेवा पुरविली जाते. या तराफ्यातून मुख्यत्वे येथील स्थानिक ग्रामस्थांच्या वाहनांची दळणवळण करण्यात येते. तराफा बंद पडल्याने स्थानिकांची अत्यंत गैरसोय होत असुन जिल्हा परिषदे कडून तात्काळ याची दुरुस्ती व्हावी अशी मागणी ते करत आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी : ओंकार सोनावले

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा