केतन गावडे, ओंकार गावडे व सिद्धेश घारगे यांच्यावर विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव
फलटण, ९ जानेवारी २०२३ : आजच्या पिढीला आदर्शवादी व सक्षम पिढी बनविण्यासाठी व्यसनमुक्तीची चळवळ सुरू आहे. ही व्यसनमुक्तीची चळवळ संपूर्ण देशात पोचावी, हा उदात्त दृष्टिकोन समोर ठेवून गोखळीतील तिघांनी गोखळी ते हम्पी हे तब्बल साडेपाचशे किलोमीटरचे अंतर सायकलद्वारे पार करून व्यसनमुक्तीचा संदेश दिला.
गोखळी (ता. फलटण) येथील केतन गावडे, पहिलवान ओंकार गावडे, पुणे येथील सिद्धेश घारगे या तिघांनी गोखळी ते कर्नाटकमधील हम्पीपर्यंत तब्बल साडेपाचशे किलोमीटर अंतराचा प्रवास दहा दिवसांमध्ये पूर्ण केला. या अनोख्या सायकल प्रवासाने आजच्या तरुणाईसमोर एक आदर्श निर्माण केला.
आजच्या युगामध्ये चारचाकी, दुचाकी वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच सायकलकडे दुर्लक्षच होत आहे. सायकल चालविणे हा एक शरीरासाठी महत्त्वपूर्ण व्यायाम मानला जात असतानाच सध्या अनेकांचे या गोष्टीकडे दुर्लक्ष होत आहे. त्यातच आजची पिढी ही सक्षम बनवून ती निर्व्यसनी बनली पाहिजे, ही शिकवण ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी दिली असून, हा संदेश महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये पोचला पाहिजे, हा दृष्टिकोन समोर ठेवून गोखळीतील या युवकांनी व्यसनमुक्त व सशक्त भारत हा संदेश देत त्यांनी सायकलने प्रवास केला. याबद्दल
या तिघांचे विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : आनंद पवार