पुरंदर, दि. ६ जुलै २०२०: कोरोनाने शहरीभागानंतर आता ग्रामीण भागामध्ये सुद्धा कोरोनाने आपले हातपाय पसरायला सुरवात केली आहे. त्यामुळे माणसाच्या जीवनातील आनंदाचा क्षण असलेले विवाहसोहळे सुद्धा अत्यंत साधेपणाने साजरे होऊ लागले आहेत. वाल्हे (ता.पुरंदर) येथील अमित नवले व शिक्रापुर येथील विशाखा खेडकर यांचा विवाह सोहळा नुकताच अत्यंत साधेपणाने पार पडला. विवाहानंतर नव वधूवरांनी वाल्हे येथील पालखी तळावर येऊन संतांच्या आवडीच्या पाच झाडांचे रोपण करुन लग्नाचा आनंद साजरा केला.
वाल्हे येथील अमित नवले व शिक्रापुर येथील विशाखा खेडकर यांचा विवाह सोहळा शिक्रापुर येथे मास्कचा वापर करत सोशल डिस्टन्सिंगचे नियम पालन करत संपन्न झाला. मात्र कोरोनाच्या काळातील या लग्नाची लोकांसह स्वत:लाही आठवण राहावी आणि दरवर्षी आपल्या गावातून पंढरपुरला जाणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना दोन क्षण सावलीचे मिळावेत यासाठी पुणे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष प्रा.दिगंबर दुर्गाडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये वड, पिंपळ, चिंच, औंदुबर आदि झाडांचे वृक्षारोपण वाल्हे येथील पालखी तळावर करण्यात आले.
याबाबत बोलताना नवरा मुलगा अमित नवले म्हणाला की, आमच्या गावामध्ये संत ज्ञानेश्वरांचा पालखी सोहळा विसावतो. यावर्षी माणसांची गर्दी नसली तरी भविष्यात या गर्दीला सावली मिळावी म्हणुन सिने अभिनेते सयाजी शिंदे यांनी सावलीची वारी या अभिनव उपक्रमाची सुरवात आमच्याच गावातून केली. त्यांचा हा उपक्रम वर्षानुवर्षे सुरू रहावा आणि आमचा परिसर वनराईने नटावा यासाठी त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आम्ही याठिकाणी पाच वृक्ष लावत आहोत.त्याचे वर्षभर संगोपणही करणार असल्याचेही त्यांनी आवर्जुन सांगितले.
यावेळी दत्तात्रय पवार, बाळासो राऊत, अजित नवले, महादेव चव्हाण,प्रा.संतोष नवले, शिरीष नवले, डॉ.रोहिदास पवार आदि उपस्थित होते. दरम्यान यावेळी नववधुवरांनी लग्नाच्या दिवशी राबविलेल्या या आगळ्यावेगळ्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे