Trichotillomania Hair Pulling Disorder Awareness: आपण बऱ्याचदा खूप तणावात असलो किंवा जर एखादी गोष्ट आपल्या मना सारखी नसेल होत. तर आपण रागात आपले केस ओढतो. पण तुम्हाला माहितीये का? जर आपण नकळत पणे सातत्याने केस ओढत असलो आणि जर त्याची आपल्याला सवय लागली की तो एक मानसिक विकारामध्ये मोडला जातो. ज्याला ट्रायकोटिलोमेनिया असे म्हटले जाते.
ट्रायकोटिलोमेनिया म्हणजे काय?

ट्रायकोटिलोमेनिया (TTM) ही एक मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या आहे, ज्यामध्ये एखादी व्यक्ती आपले केस अनियंत्रितपणे ओढून काढते किंवा तोडते. ही अवस्था ऑब्सेसिव्ह-कंपल्सिव्ह डिसऑर्डर (OCD) च्या प्रकारात मोडते. जेव्हा ही समस्या गंभीर स्वरूप धारण करते, तेव्हा ती व्यक्तीच्या आनंदावर, मानसिक स्वास्थ्यावर आणि एकूणच जीवनाच्या गुणवत्तेवर खूप वाईट परिणाम करते. या अवस्थेमुळे व्यक्तीला सामाजिक, भावनिक आणि शारीरिक त्रास होऊ शकतो, ज्यामुळे त्यांचे दैनंदिन जीवन आणि आत्मविश्वासावर परिणाम होतो.
कोणाला होऊ शकते?
ट्रायकोटिलोमेनिया विशेषतः लहान मुले आणि किशोरवयीन मुलांमध्ये जास्त प्रमाणात आढळते. ही समस्या काही काळासाठी दिसते आणि बऱ्याचदा स्वतःहून निघून जाते. परंतु, गंभीर स्वरूपाची ही समस्या साधारणपणे १० ते १३ वयात सुरू होते, जेव्हा मुलं किशोरवयात प्रवेश करतात. परंतु प्रौढांमध्ये, पुरुषांच्या तुलनेत महिलांना ही समस्या जास्त जाणवते.
ट्रायकोटिलोमेनियाची लक्षणे;

या समस्येत व्यक्ती अनियंत्रितपणे आपले केस ओढते, सामान्यतः एक-एक केस काढते. बऱ्याचदा व्यक्ती एकाच ठिकाणचे केस सातत्याने ओढते. सर्वात सामान्य ठिकाणे म्हणजे डोक्याचे केस, भुवया, पापण्या आणि काहीवेळा जांघेचे केस. ही सवय लहान मुलांमध्ये स्वतःला शांत करण्याचा एक मार्ग म्हणून दिसते आणि ती बऱ्याचदा कालांतराने थांबतेसुद्धा. परंतु किशोरवयीन आणि प्रौढांमध्ये ही समस्या अधिक गंभीर बनते आणि त्यांच्यावर दीर्घकालीन परिणाम करू शकते.
ट्रायकोटिलोमेनिया सारखे ट्रायकोफेजिया ही पण एक धोकादायक आहे;
सुमारे २०% लोक जे केस ओढतात, तेच केस ते नंतर खातात याला ट्रायकोफेजिया असे म्हणतात.
यामुळे पचनसंस्थेत केसांचा गोळा तयार होऊ शकतो, ज्याला हेयरबॉल असे म्हणतात. हा गोळा कधीकधी धोकादायक ठरतो आणि त्यामुळे पचनसंस्थेला नुकसान होऊ शकते. आणि शस्त्रक्रिया करावी लागू शकते.
याचा आपल्या शरीरावर आणि मनावर काय परिणाम होतो;

केस ओढताना, विशेषतः पिन्सेटसारख्या साधनांचा वापर केल्यास, त्वचेला आणि त्याखालील tissues ला इजा होऊ शकते. यामुळे कायमचे केस गळणे, त्वचेचे नुकसान किंवा जखमा होऊ शकतात. ट्रायकोटिलोमेनियामुळे व्यक्तीला लाज वाटते किंवा आत्मविश्वास कमी होतो आणि याचा परिणाम हा सामाजिक जीवनावर होतो. बऱ्याचदा लोक ही समस्या डॉक्टरांनाही सांगण्यास संकोच करतात, कारण त्यांना डॉक्टरांवर पूर्ण विश्वास होईपर्यंत ते ही माहिती लपवतात. केस गळल्यामुळे किंवा त्वचेच्या जखमांमुळे व्यक्ती स्वतःला इतरांसमोर सादर करण्यास कचरते. यामुळे नैराश्य किंवा चिंता वाढू शकते.
मग का होते ट्रायकोटिलोमेनिया?
काही संशोधनात असे दिसते की, डीएनएमधील बदलांमुळे ही समस्या उद्भवू शकते. याबाबत अधिक संशोधनाची गरज आहे. किंवा असं ही म्हणतात या अवस्थेत असलेल्या लोकांच्या मेंदूच्या काही भागांमध्ये किंवा रासायनिक संतुलनात बदल आढळतात. यामुळे त्यांना अनियंत्रितपणे केस ओढण्याची इच्छा होते.
याचे उपचार कसे होतात?

ट्रायकोटिलोमेनियावर देखील उपचार शक्य आहेत. या उपचारांमध्ये थेरेपी किंवा औषधंचा उपयोग केला जातो. यात CBT म्हणजे (कॉग्निटिव्ह बिहेव्हियरल थेरपी) चा वापर होतो यामुळे व्यक्तीला आपल्या सवयी ओळखून त्या बदलण्यास शिकता येते. काही मानसिक आरोग्याच्या समस्यांसाठी वापरली जाणारी औषधे ट्रायकोटिलोमेनियावर परिणामकारक ठरू शकतात. मात्र, याबाबत अजून संशोधन सुरू आहे आणि कोणतेही विशिष्ट औषध हे प्रमाणित उपचार म्हणून स्वीकारले गेलेले नाही.
काय करावे?
जर तुम्हाला किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीला ट्रायकोटिलोमेनियाची लक्षणे दिसत असतील तर लवकरात लवकर मानसिक आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्या. ही समस्या लपवण्याऐवजी त्या बद्दल मोकळेपणाने डॉक्टरांशी चर्चा करा. लाज वाटण्याची गरज नाही कारण ही एक वैद्यकीय अवस्था आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी; जुई काळे













































