शिक्षण क्षेत्राशी निगडित सर्व प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्याचा प्रयत्न केला : आ.बाळाराम पाटील

12

माणगाव, ५ जानेवारी २०२३ गेल्या सहा वर्षात कोकण विभाग शिक्षक विभागाचा आमदार म्हणून शिक्षण क्षेत्राशी निगडित असणाऱ्या साऱ्या प्रश्नांवर, समस्यांवर आपण प्रभावीपणे काम करण्याचा प्रयत्न केला, असे मत कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आ.बाळाराम पाटील यांनी माणगाव येथे आयोजित मेळाव्यात शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्याशी संवाद साधताना व्यक्त केले.

माणगाव टिकमभाई मेथा कॉमर्स कॉलेज येथे गुरुवारी कोकण विभाग शिक्षक मतदार संघाच्या दि.३० जानेवारी २०२३ रोजी होणार्‍या द्विवार्षिक निवडणूकीच्या निमित्ताने शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार आ.बाळाराम पाटील यांनी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्याशी संवाद साधला.

आ. बाळाराम पाटील म्हणाले की, गेल्या सहा वर्षात मतदार संघात जेवढी चांगली कामे करता येतील, त्यासाठी विशेष प्रयत्न केले. माणगावला या निवडणूकीच्या निमित्ताने आज आपली पहिली सभा होत आहे. गेल्या सहा वर्षाच्या कालखंडात काम करताना आपण कटाक्षाने एक गोष्ट पाळली. ती म्हणजे, ज्या शिक्षकांनी मला निवडून दिले, त्या सर्व शिक्षकांना अभिमान वाटेल असे काम करण्याचा मी प्रयत्न केला आहे. अनेक शिक्षकांना अनुदान मिळवून देण्यासाठी पाठपुरावा व प्रसंगी आंदोलन करुन, शिक्षकांना अनुदान मिळवून दिले. तसेच शिक्षकांच्या प्रश्नांसाठी, समस्यांसाठी मुंबई येथील आझाद मैदानात वेळोवेळी आंदोलने करत शिक्षकांचे अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच मी केलेल्या कामांचे मूल्यमापन करून आपण सर्वांनी मला या निवडणूकीत निवडून द्यावे असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले आहे.

यावेळी तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुभाष केकाणे, शेकापचे जेष्ठ नेते अस्लमभाई राऊत, पनवेल को-ऑप.बँकेचे चेअरमन बाबुराव पालकर, तालुका चिटणीस रमेश मोरे, तालुका राष्ट्रवादी महिला आघाडीच्या अध्यक्षा संगीता बक्कम, जे.बी.सावंत एज्युकेशन सोसायटीचे भाऊसाहेब सावंत, माणगाव तालुका शेतकरी खरेदी-विक्री संघाचे सभापती निलेश थोरे, माणगाव नगरसेविका ममता थोरे, उणेगाव सरपंच राजू शिर्के, देगाव उपसरपंच दिनेश गुगुळे, तालुका शेकाप सहचिटणीस राजेश कासारे, जिल्हा चिटणीस मंडळाचे नामदेव शिंदे, अँड.कौस्तुभ धामणकर, गोविंद पवार यांच्यासह शिक्षकवर्ग व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रमोद जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा