११ दिवसांच्या अविरत झंझावातानंतर, साश्रू नयनांनी अखेर त्रिविक्रम ढोल ताशा पथकाच्या २०२५ च्या गणेशोत्सवाची सांगता झाली.
२०१७ साली आखाती देशातील पहिल्या आणि एकमेव अशा मानाच्या पथकाची स्थापना झाली आणि आज २०२५ मध्ये पहिल्यांदाच एका गणेशोत्सवात ४० हून अधिक ठिकाणी वादन करून जागतिक पातळीवर नवा विक्रम नोंदवला.
मोठ्या उद्योगपतींपासून ते अभिनेते विवेक ओबेरॉय, गायक सोनू निगम, ४ बॉलीवूड रेडिओ स्टेशन आणि व्हर्जिन रेडिओपर्यंत सर्वत्र त्रिविक्रम पथकाने आपल्या सादरीकरणाने लोकांची मने जिंकली. UAE सोबत यंदा Oman मधूनही वादनासाठी खास आमंत्रण मिळाले, हा पथकासाठी मानाचा तुरा ठरला.
दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रत्येक वादकाने आपल्या नोकरी, व्यवसाय आणि कुटुंब सांभाळत बाप्पासाठी अथक परिश्रम घेतले. एकाच वेळी ४-५ ठिकाणी वादन करणाऱ्या तुकड्यांनी उत्सवाचा जल्लोष उंचावला.
संपूर्ण उत्सव संपवताना वादकांच्या चेहऱ्यांवरचा आनंद आणि समाधान स्पष्ट दिसून येत होता. आता २०२६ च्या गणेशोत्सवासाठी त्रिविक्रम पथक आधीपासून सज्ज आहे, अशी भावना प्रत्येक सदस्याने व्यक्त केली.
🙏 गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या!
दुबई प्रतिनिधी












































