नाशिकमधील वरवंडी येथे गायींची अवैध वाहतूक करणारा ट्रक पकडला

देवळा,नाशिक ८ ऑगस्ट २०२३ : वरवंडी तालुका देवळा येथे आज दुपारी एक वाजता देवळाच्या दिशेने जात असलेला गायींनी भरलेला ट्रक पकडून देवळा पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला. आज दुपारी एक वाजेच्या सुमारास रवळजी तालुका कळवण येथून देवळ्याच्या दिशेने गायी भरुन येत असलेला ट्रक (क्रमांक एम.एच १८ इ. ७६०९) वरवंडी तालुका देवळा येथे नागरिकांनी अडवला.

या घटनेची देवळा पोलिसांना माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक विकास कचरे, पोलीस नाईक विनय देवरे आदींनी घटनास्थळी दाखल होऊन, ट्रक पुढील कारवाईसाठी पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला आहे. यावेळी ट्रक मधील गायी, गोशाळेत नेत असल्याचे व रवळजी ग्रामपंचायतीने तशी परवानगी दिली असल्याचे पत्र यावेळी संबंधितांनी सहायक निरीक्षक दिपक पाटील यांना दिले.

याबाबत ग्रामपंचायतीला गायींची अवैध वाहतूक करण्याची परवानगी देता येते का, आदी संपूर्ण माहिती घेऊन व चौकशी करुन पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सहायक पोलिस अधीक्षक पाटील यांनी यावेळी दिली. चौकशीत कत्तलीसाठी नेत असल्याचे निष्पन्न झाल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा