भारत-अमेरिका संबंधात गेल्या सात महिन्यांपासून दुरावा निर्माण झाला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘टॅरिफ वॉर’मुळे तो वाढत होता. भारताने अमेरिकेला पर्याय म्हणून ‘साऊथ ग्लोबल’ धोरणाचा पुरस्कार केला. भारत, चीन आणि रशियाच्या जवळ येण्यामुळे अमेरिकेला जागतिक महासत्ता पद गमावण्याची भीती निर्माण झाली होती. अमेरिकेत ट्रम्प यांच्याविषयी नाराजी वाढत होती. त्यातच अमेरिकेच्या न्यायालयाने त्यांना चांगलेच फटकारले होते. त्यामुळे आता ट्रम्प यांना आपल्या चुकीची जाणीव होऊन त्यांनी भारताविषयीचा सूर बदलला आहे. त्यामुळे दोन्ही देशांत संबंध सुरळीत होतील का, याची चर्चा सुरू झाली आहे.
गणेशाचे आगमनाच्या आणि त्यानंतरच्या दुसऱ्या दिवशीच्या दोन स्तंभात ट्रम्प टॅरिफरूपी विघ्नही दूर होईल, असे म्हटले होते. त्या वेळी गणेश ट्रम्प यांना सद्बुद्धी देईल, असे संपादकीयात म्हटले होते. गेल्या दोन दिवसांची त्यांची वक्तव्ये पाहता आता त्यांना खरेच सद्बुद्धी मिळाली आहे असे वाटावे, अशी स्थिती आहे. त्यांनी अगोदर चीनमुळे भारत, रशियासारखे मित्र आम्ही गमावले, अशी भावना व्यक्त केली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी लगेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताचे कौतुक करून अमेरिका आणि भारतातील संबंध सुरळीत होण्याची आशा व्यक्त केली. ट्रम्प यांच्या वक्तव्यातून लगेच टॅरिफचे विघ्न दूर होईल, असे नाही; परंतु दोन्ही देशांत वाटाघाटीचे पर्व सुरू होईल, अशी आशा व्यक्त करता येईल. ट्रम्प यांच्या वक्तव्याला मोदी यांनीही तितकाच सकारात्मक प्रतिसाद दिला. ट्रम्प यांना ही उपरती का झाली आणि भारत-अमेरिका संबंध खरेच पूर्वपदावर येतील का, याचा उहापोह करावा लागेल. भारताने रशियाकडून कच्चे तेल खरेदी केल्याबद्दल अमेरिका खूश नाही. स्वतः ट्रम्प यांनी हा मुद्दा अनेक वेळा उपस्थित केला. ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त कर लादले. त्यामुळे भारत-अमेरिका संबंधा कटुता आली. अमेरिकेच्या निर्यातीवर परिणाम होण्याच्या शक्यतेने भारताने चीन आणि रशियाशी संबंध सुधारण्यावर भर दिला.
ट्रम्प यांच्या चुकीच्या परराषट्रनीतीमुळे आणि भारताला दुखावण्यामुळे अमेरिकेत ट्रम्प यांच्यावर टीका सुरू झाली. अमेरिकेची अर्थव्यवस्था सध्या संकटातून जात आहे. तिथे मंदीचे सावट आहे. अमेरिकेतील वित्त संस्थांनी तसा इशारा दिला आहे. त्यात टॅरिफ लादण्याची ट्रम्प यांची कृतीच न्यायालयाने बेकायदेशीर ठरवली आहे. भारतावर टॅरिफ लादल्याने अमेरिकेत मंदी महागाई वाढण्याची भीती व्यक्त व्हायला लागली होती. अंतर्गत समस्यांनी वेढलेल्या अमेरिकेत ट्रम्प यांच्या नीतीवर आक्षेप घेतले जात होते. भारताने चीन आणि रशियाच्या जवळ जाऊ नये, म्हणून अमेरिकेचे परराष्ट्र धोरण होते. तेच धोरण ट्र्म्प यांनी पायदळी तुडवले. अमेरिकन काँग्रेस त्यांच्यावर नाराज होती. अध्यक्षांन तिथे जादा अधिकार असले, तरी काँग्रेसला डावलता येत नाही. ही स्थिती लक्षात आल्यानेच आता ट्रम्प यांनी ‘यू टर्न’ घेतला असावा. ट्रम्प यांनी आता मोदी यांना त्यांचे चांगले मित्र म्हटले. त्यांना एका महान नेत्याची पदवीही दिली. जेव्हा ट्रम्प यांनी मोदी यांचे कौतुक केले, तेव्हा भारतानेही उत्तर देण्यास उशीर केला नाही. पहिल्यांदाच, मोदी यांनी ट्रम्प यांच्या कौतुकाचा लगेच फायदा घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे असे वाटू लागले, की भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध पुन्हा रुळावर येऊ शकतात.
बऱ्याच काळापासून भारत आणि अमेरिकेतील तणावाचा हा बर्फ वितळवण्याचे प्रयत्न सुरू होते. मोदी आणि ट्रम्प यांच्यातील ‘सोशल मीडिया’ संभाषणामुळे दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. ट्रम्प यांनी मोदी यांचे कौतुक केले असले, तरी भारताबाबतची त्यांची भूमिका अजूनही कठोर आहे; पण तरीही भारताने आता एक जुगार खेळला आहे. आता दोन्ही नेत्यांमधील संबंध पुन्हा रुळावर आणण्याचा प्रयत्न दिसून आला आहे. मोदी यांनीही ट्रम्प यांना उत्तर दिले आहे. मोदी यांनी इंस्टाग्रामवर लिहिले, की मी ट्रम्प यांच्या भावनांचा, त्यांच्या सकारात्मक दृष्टिकोनाचा आदर करतो. भारत आणि अमेरिकेत सकारात्मक आणि दूरदर्शी भागीदारी आहे. मोदी यांचे या प्रकारचे ट्विट एका निश्चित रणनीतीचा भाग आहे. भारताने अमेरिकेला जो संदेश पाठवायचा होता, तो पाठवण्यात आला आहे. शांघाय सहकार्य परिषदेत मोदी-रशियाचे अध्यक्ष वलादीमिर पुतीन आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांचे एकत्र चित्र हे सांगण्यासाठी पुरेसे होते, की आता कोणीही भारताला वेगळे करू शकत नाही आणि भारताचे स्वतःचे विश्वासू मित्र आहेत. भारत सध्या महात्मा गांधी यांच्या सत्याग्रह मॉडेलचे अनुसरण करत आहे. यामध्ये, तुम्ही आम्हाला मारू शकता; परंतु आम्ही लगेच उत्तर देणार नाही.
अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंध पुन्हा सामान्य करण्याची ही योग्य वेळ आहे. असेही म्हटले जात आहे, की आता हस्तक्षेप थेट उच्च अधिकाऱ्यांनी, उच्चपदस्थ नेत्यांनी केला पाहिजे. तथापि, काही तज्ज्ञांचे मत आहे, की भारत-पाकिस्तान तणावादरम्यान ट्रम्प यांचे युद्धबंदीचे दावे अधिक चांगल्या प्रकारे हाताळता आले असते. अलिकडच्या शांघाय सहकार्य परिषदेत भारताची चीनशी असलेली जवळीक आणि भारत-रशिया-चीन जुगलबंदी अमेरिकेच्या धोरणांना कमकुवत करते. ट्रम्प यांच्यावर त्यांच्याच देशात टीका होत आहे, की ते भारतासारखा मित्र गमावणार आहेत. ट्रम्प यांनी त्यांच्या ‘ट्रुथ सोशल पोस्ट’चाही उल्लेख केला. त्यामध्ये त्यांनी असा दावा केला होता, की अमेरिकेने भारत आणि रशियासारखे मित्र गमावले आहे. भारत रशियाकडून तेल खरेदी करत आहे. त्याबद्दल ट्रम्प यांनी चिंता व्यक्त केली. भारत आणि अमेरिकेतील संबंध टॅरिफ वादामुळे ताणले गेले असताना हे विधान आले आहे. ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के परस्पर शुल्क आणि रशियाकडून तेल खरेदीसाठी अतिरिक्त २५ टक्के दंडात्मक शुल्क लादले आहे. मोदी अमेरिकेसोबतच्या आमच्या भागीदारीला खूप महत्त्व देतात. ट्रम्प यांच्याशी त्यांचे नेहमीच चांगले वैयक्तिक संबंध राहिले आहे. आता ट्रम्प यांचा हा सौम्यपणा त्यांच्या मजबुरीचे लक्षण आहे का, हा प्रश्न आता चर्चेचा विषय बनला आहे.
अलीकडेच शांघाय सहकार्य शिखर परिषदेसाठी मोदी यांनी चीनला भेट दिली आणि रशियाशी व्यापारी संबंध राखले आहेत. मोदी जपान आणि चीन दौऱ्यावरून परतल्यानंतर ट्रम्प यांचा सूर बदलू लागला आहे. पुतीन आणि जिनपिंग यांना चीनमध्ये एकाच चौकटीत पाहून ट्रम्प अस्वस्थ झाले होते. शांघाय सहकार्य परिषदेनंतर ट्रम्प यांनी भारताबद्दल कडक टिप्पणी केली होती; पण आता त्यांचा सूर मऊ होऊ लागला आहे. त्यांनी मोदी यांना आपला मित्र म्हटले आहे आणि भारत-अमेरिका संबंधांवर मोठे विधानही केले आहे. भारताबद्दल कठोर भूमिका दाखवणारे ट्रम्प का मऊ झाले, हे जाणून घेतले पाहिजे. अमेरिकन राजकारणात ट्रम्प यांचा स्वभाव कधीच खात्रीचा नाही. ते कधी खूप कडक तर कधी खूप सौम्य वागतात. आता प्रश्न असा निर्माण होतो, की ट्रम्प यांच्या दृष्टिकोनात इतका मोठा बदल का झाला? शांघाय सहकार्य शिखर परिषदेत मोदी, पुतीन आणि जिनपिंग यांच्यातील जवळीकतेने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले. या व्यासपीठावरून भारताने बहुध्रुवीय जगात आपली स्वतंत्र भूमिका बजावेल हे दाखवून दिले. भारत-अमेरिका व्यापार करारावर चर्चा सुरू आहे. शेती आणि दुग्धव्यवसाय यासारख्या क्षेत्रात मतभेद आहेत; परंतु नोव्हेंबरपर्यंत करार होण्याची अपेक्षा आहे. या करारामुळे दोन्ही देशांना मोठे आर्थिक फायदे मिळू शकतात.
भारतावर ५० टक्के कर लादण्याच्या निर्णयाबद्दल ट्रम्प यांना त्यांच्याच देशात टीकेचा सामना करावा लागत आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे, की यामुळे गेल्या दोन दशकांपासूनचे संबंध कमकुवत होऊ शकतात. अहवालांनुसार, कर वादादरम्यान ट्रम्प यांनी मोदी यांच्यांशी अनेक वेळा बोलण्याचा प्रयत्न केला; परंतु तो अयशस्वी झाला. ‘ब्रिक्स’ शिखर परिषदेत सहभागी होऊन भारत अमेरिकन धोरणांवरील जागतिक चर्चेचा भाग बनला. या बैठकीचा उद्देश अमेरिकेच्या कर पावलांच्या विरोधात सामूहिक रणनीती तयार करणे हा होता. भारत अमेरिकेसाठी धोरणात्मक आणि आर्थिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. ‘इंडो-पॅसिफिक’मध्ये चीनचा सामना करण्याची क्षमता, लोकशाही आणि वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था यामुळे भारत अमेरिकेचा एक महत्त्वाचा भागीदार आहे. तसेच, भारतीय वंशाची मोठी लोकसंख्या अमेरिकन राजकारण आणि समाजात प्रभावी भूमिका बजावते.
भागा वरखडे












































