आधुनिक शेखचिल्ली!

29
A digital illustration depicting the impact of a stock market crash, featuring a businessman (resembling Elon Musk) looking at a large digital screen displaying falling stock graphs. The background includes Wall Street with a stormy sky, symbolizing economic uncertainty. The color palette is dark and moody, emphasizing financial instability.
"ट्रम्पची व्यापार धोरणे: ती अमेरिकेला मदत करण्यापेक्षा जास्त नुकसान पोहोचवत आहेत का?

Trump’s Tariff and Its Impact on the US Economy: जग आता परस्परांशी इतके जोडले गेले आहे, की एखाद्या देशात छोटी घटना घडली, तरी तिचे परिणाम जगाला भोगावे लागत असतात. अमेरिका ही तर महाशक्ती. तिच्या अध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प हे विक्षिप्त, एकाधिकारशाही असलेले गृहस्थ आल्यापासून जग अनिश्चततेच्या गर्तेत चालले आहे. जगात पुन्हा एकदा आर्थिक मंदी येण्याची चाहूल लागली असून, तिला ट्रम्प हेच जबाबदार असतील.

पूर्वीच्या हिंदीच्या पुस्तकात एक धडा होता. ज्या फांदीवर आपण बसलो आहोत, तीच फांदी शेख चिल्ली नावाची व्यक्ती तोडत होती. तिला इतकीही जाणीव नव्हती, की ती फांदी तोडली, तर आपणही खाली पडू. येणारे जाणारे त्याला समजून सांगत होते; परंतु कुणाचे ऐकण्याची मनस्थिती नसली, की काय होते, हे त्या शेख चिल्लीने अनुभवले होते. आपण बसलेल्या फांदीसह तो खाली पडला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबतीत आता तेच होत आहे. इतरांना धडा शिकवण्याच्या नादात त्यांना स्वतःलाच धडा शिकायला मिळाला. स्वतः होऊन स्वतःचीच लंकादहन करण्याची त्यांची वृत्ती जगाला आर्थिक संकटात टाकत आहे. टॅरिफ विवाद आणि फेडरल सरकारच्या धोरणांतील अनिश्चिततेमुळे मंदीची भीती निर्माण झाली आहे. गेल्या आठवड्यातील भांडवली बाजारातील जोरदार विक्री या आठवड्यातही कायम राहिली.

तिन्ही प्रमुख निर्देशांक मोठ्या नुकसानीला बळी पडले. एस अँड पी ५०० आता फेब्रुवारी २०१९ च्या त्याच्या सर्वकालीन उच्चांकावरून आठ टक्क्यांपेक्षा खाली आहे. ‘नॅसडॅक कंपोझिट’ डिसेंबरच्या शिखरावरून दहा टक्क्यांपेक्षा जास्त घसरला आहे. बाजारातील आर्थिक अनिश्चितता, संभाव्य मंदीची भीती आणि वाढत्या व्यापारातील तणावामुळे विक्रीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना चार ट्रिलियन डॉलर्सचे नुकसान झाले आहे. सोमवारी डाऊ जोन्स इंडस्ट्रियल ॲव्हरेज ८९० पॉइंट्स किंवा २.१ टक्क्यांनी घसरून ४१ हजार ९१२ वर बंद झाला. एस अँड पी ५०० २.७ टक्के किंवा १८७ अंकांनी घसरून ५,६१५ वर आला. व्यवसायाच्या दृष्टीने हे या वर्षातील सर्वात खराब ट्रेडिंग सत्र ठरले. टेक स्टॉकचा मुख्य आधार ‘नॅसडॅक’ने गेल्या आठवड्यात पुनर्प्राप्तीनंतर सोमवारी ७२८ अंक किंवा चार टक्के घसरून आणखी एक धसका घेतला.

अमेरिकन बाजारात अलीकडील विक्रीची अनेक कारणे आहेत. यामध्ये व्यापार धोरणावरील अनिश्चितता, संभाव्य मंदीची भीती आणि उच्च स्टॉक व्हॅल्युएशनवरील चिंता यांचा समावेश आहे. त्यातही तंत्रज्ञान समभागांना सर्वाधिक फटका बसला आहे. ‘टेस्ला’ने एकाच दिवसात १२५ अब्ज डॉलर्सचे मूल्य गमावले. त्याचे समभाग १५ टक्क्यांपेक्षा जास्त घसरले. अल्फाबेट, ॲपल, ‘एनविडिया’चे शेअर्स जवळपास पाच टक्के घसरले. ‘डेल्टा एअरलाइन्स’चे समभाग १४ टक्के घसरले. कंपनीने आपल्या पहिल्या तिमाहीतील नफ्याचा अंदाज अर्ध्यावर कमी केला आहे.संभाव्य मंदीबद्दल गुंतवणूकदारांच्या चिंता वाढल्या आहेत.

ट्रम्प यांनी सध्याच्या परिस्थितीचे वर्णन ‘संक्रमण कालावधी’ असे केले आणि मंदीची शक्यता नाकारली नाही. यानंतर बाजारातील गुंतवणूकदारांची भीती आणखी वाढली. ‘फॉक्स न्यूज’च्या ‘संडे मॉर्निंग फ्युचर्स विथ मारिया बार्टिरोमो’ वर त्यांना या वर्षी मंदीची अपेक्षा आहे का असे विचारले असता, ट्रम्प यांनी उत्तर दिले, ‘मला अशा गोष्टींचा अंदाज वर्तवायला आवडत नाही. हा संक्रमणाचा काळ आहे कारण आपण ज्या गोष्टींचा सामना करत आहोत ते खूप मोठे आहे.’ त्यांच्या या वक्तव्याचा बाजारावर प्रतिकूल परिणाम झाला; मात्र ‘व्हाईट हाऊस’ने मंदीच्या भीतीवर आपली भूमिका मांडली आहे. बाजारपेठेत घसरण झाली असली, तरी अर्थव्यवस्था मजबूत असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

‘नॅशनल इकॉनॉमिक कौन्सिल’चे प्रमुख केविन हॅसेट म्हणाले, की अर्थव्यवस्थेच्या भवितव्याबद्दल खूप आशावादी असण्याची अनेक कारणे आहेत; मात्र या तिमाहीत डेटामध्ये काही उणिवा नक्कीच आहेत. कर कपातीमुळे गुंतवणुकीला आणि वास्तविक वेतनाला चालना मिळेल यावर भर देऊन, त्यांनी दरांबद्दलची अनिश्चितता लवकरच दूर केली जाईल असे सुचवले. तथापि, गुंतवणूकदार साशंक आहेत.

कारण सध्या सुरू असलेली बाजारातील अस्थिरता व्यापक चिंता दर्शवते. अमेरिकन शेअर बाजारातील घसरण आणि तिथल्या अर्थव्यवस्थेत कोणतीही मंदी आल्यास त्याचा परिणाम भारतीय बाजारावर पडेल. जागतिक अनिश्चितता आणि परदेशी गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणात विक्री झाल्यामुळे भारतीय बाजार आधीच दबावाखाली आहे. ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणांमुळे आर्थिक वाढीबाबत अनिश्चितता आणखी वाढली आहे. त्यामुळे परकीय भांडवल काढण्याच्या प्रक्रियेला आणखी वेग येऊ शकतो. तज्ज्ञ गुंतवणूकदारांना देशांतर्गत उपभोग-संबंधित समभागांवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला देत आहेत. कारण आयटी आणि फार्मासारख्या निर्यात-केंद्रित क्षेत्रांमध्ये प्रचंड अस्थिरता दिसू शकते.

गुंतवणूकदार देशांतर्गत उपभोग-संबंधित स्टॉकवर लक्ष केंद्रित करून स्वतःचे संरक्षण करू शकतात. बाजाराशी संबंधित अनेक महत्त्वाच्या घटकांवर गुंतवणूकदार लक्ष ठेवून आहेत. यामध्ये महागाई-संबंधित अहवाल, ‘फेडरल रिझर्व्ह’चे व्याजदर निर्णय आणि अर्थव्यवस्था स्थिर करण्यासाठी संभाव्य सरकारी उपायांचा समावेश आहे. गुंतवणूकदारांच्या आत्मविश्वासात आणखी घसरण झाल्यामुळे बाजार आणखी कमी होऊ शकतो. तज्ज्ञांचे मत आहे, की बाजारातील घसरणीचे मुख्य कारण म्हणजे ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाबाबत संभ्रमात असलेल्या गुंतवणूकदारांची चिंता आणि मंदीची शक्यता.

अमेरिकन शेअर बाजारातील घसरणीचा परिणाम ‘क्रिप्टोकरन्सी’वरही झाला. बिटकॉइनची किंमत सोमवारी ७८ हजार डॉलरपर्यंत घसरली. ती नोव्हेंबरपासूनची नीचांकी पातळी आहे. घसरणीच्या काळात, गुंतवणूकदार या धोकादायक मालमत्तेमधून पैसे काढत आहेत. त्यामुळे ‘क्रिप्टो मार्केट’मध्ये दबाव आहे. टॅरिफबाबत ट्रम्प प्रशासनाने घेतलेल्या नव्या निर्णयांमुळे गुंतवणूकदारही नाराज झाले आहेत. ट्रम्प यांनी कॅनडा आणि मेक्सिकोमधील आयातीवर नवीन शुल्क लागू करण्याचा इशारा दिला आहे. त्यांनी चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंवरील शुल्क दहा टक्क्यांवरून वीस टक्के केले आहे. याशिवाय स्टील आणि ॲल्युमिनियमवर २५ टक्के दर लागू केला आहे. कॅनडा आणि मेक्सिकोमध्ये अमेरिकन वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मोहीम सुरू झाली आहे.

अन्य देशांतून अमेरिकन वस्तूंना पर्याय शोधला जात आहे. त्यामुळे अमेरिकन उत्पादक धास्तावले असून, या उद्योगांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. या जागतिक कमजोरीचा भारतातील देशांतर्गत बाजार कसा सामना करतो याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष असेल. जर विदेशी गुंतवणूकदारांची विक्री वाढली, तर भारतीय बाजारातही कमजोरी दिसू शकते. चलनवाढ अपेक्षेपेक्षा जास्त राहिल्यास, बाजारात आणखी कमजोरी दिसू शकते.

अमेरिकन शेअर बाजारातील मोठ्या घसरणीने जागतिक गुंतवणूकदार चिंतेत पडले आहेत. अमेरिका ही जागतिक महासत्ता आहे. एलन मस्क जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आहेत. अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत मस्क यांनी ट्रम्प यांना उघडपणे पाठिंबा दिला होता. त्यानंतर ट्रम्प अध्यक्ष बनताच मस्क ‘किंग मेकर’च्या भूमिकेत दिसू लागले. अमेरिकन अर्थव्यवस्थेशी संबंधित निर्णयांमध्येही मस्क यांची उपस्थिती दिसून आली. ट्रम्प हे ही मस्क यांच्याशी सहमत होऊ लागले. दरम्यान, ट्रम्प यांनी व्यापार शुल्काबाबत आघाडी उघडली. ‘अमेरिका फर्स्ट’ ही घोषणा बरोबर होती; पण इतर देशांवर दबाव टाकून ‘अमेरिका फर्स्ट’चे स्वप्न आता पूर्ण होताना दिसत नाही.

शपथ घेतल्यापासून, ट्रंप सातत्याने शुल्काबाबत एकतर्फी घोषणा करत आहेत. चीन, कॅनडा, मेक्सिको आणि भारत यांसारख्या देशांसाठी आदेश जारी करण्यात आले. त्यांच्या या निर्णयामुळे इतर देशांवर दबाव येईल असे त्यांना वाटत होते. ट्रम्प यांच्या टॅरिफ हल्ल्याचा नंतर इतर देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल; परंतु त्याआधी त्याचा परिणाम आता अमेरिकेवरच दिसून येत आहे.

कारण चीन आणि कॅनडाने ट्रम्प यांच्या करवाढीला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. गेल्या काही दिवसांपासून ट्रम्प यांचे अमेरिकेतील डावपेच मागे पडल्याचे दिसत आहे. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत मंदीचे आवाज ऐकू येऊ लागले आहेत. ‘नॅसडॅक’च्या घसरणीमुळे इलॉन मस्क यांना सर्वात मोठा फटका बसला आहे. ट्रम्प यांनी ज्या प्रकारे जागतिक शुल्क युद्ध सुरू केले, त्याचा सर्वात मोठा परिणाम आता अमेरिकेवरच दिसून येत आहे.

आता जेव्हा अमेरिकेला टॅरिफ युद्धाचा सर्वाधिक फटका बसणार आहे असे वाटू लागले आहे, तेव्हा ट्रम्प प्रशासन तडजोडीच्या मूडमध्ये असल्याचे दिसते. कॅनडा आणि मेक्सिकोवर लादण्यात आलेले शुल्क तूर्तास स्थगित करण्यात आले आहे, तर खुद्द ट्रम्प भारताशी करार करण्याबाबत बोलत आहेत. अमेरिकेच्या नव्या धोरणामुळे अमेरिकेलाच मोठा फटका बसत असून मस्क यांचे सर्वाधिक नुकसान होत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी, भागा वरखाडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा