ट्रम्प यांच्या मुलानं शेअर केला भारताचा वादग्रस्त नकाशा…

वॉशिंग्टन, ४ नोव्हेंबर २०२०: मंगळवारी अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची मतदान प्रक्रिया पार पडली. कोरोनाचं संकट असलं तरी यादरम्यान मोठ्या प्रमाणात मतदार मतदानासाठी बाहेर पडले होते. अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या मोठ्या रांगाही पाहायला मिळाल्या होत्या. दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलाने म्हणजेच ट्रम्प ज्युनिअर यांनी निवडणुकांच्या निकालाचा अंदाज एका नकाशाद्वारे शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी भारताच्या नकाशाबाबत मात्र मोठी चूक केली आहे. त्यांनी शेअर केलेल्या नकाशामध्ये जम्मू आणि काश्मीर हा भारताचा नव्हे तर पाकिस्तानचा भाग असल्याचं दिसत आहे.

ट्रम्प ज्युनियर यांनी शेअर केलेला जगाचा नकाशा दोन रंगांमध्ये आहे. बहुसंख्य देश हे लाल रंगात तर काही देश हे निळ्या रंगात दाखवले आहेत. लाल रंग हा त्यांचे वडील डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाशी निगडीत आहे. तर निळा रंग हा डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांच्या पक्षाशी निगडीत होता. लाल रंगात दिसणारे देश हे ट्रम्प प्रभावित देश आाहेत, तर निळ्या रंगात दिसत असलेले देश हे बायडन प्रभावित देश असल्याचा दावा ट्रम्प ज्युनियर यांनी केला आहे.

हा नकाशा त्यांनी आपल्या ट्विटर हँडल वरून शेअर केला होता. “अखेर माझा निवडणुकीच्या निकालाचा अंदाज व्यक्त करणारा नकाशा तयार झाला,” असं त्यांनी त्याला कॅप्शनही दिलं होतं. यामध्ये भारत निळ्या रंगात दिसत आहे. तसेच या नकाशात काश्मीर पाकिस्तानचा भाग असल्याचे दाखवण्यात आले आहे. भारतासह चीन, मेक्सिको, लायबेरिया हे देश बायडन यांना समर्थन देणारे देश असल्याचं नकाशात दाखवण्यात आले आहे. तर पाकिस्तान, रशिया आणि ईराणसारखे देश ट्रम्प समर्थक असल्यां दिसत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा