तुकाई टेकडी: दारू, गांजा आणि भीतीचे सावट

181
तुकाई टेकडी: दारू, गांजा आणि भीतीचे सावट
तुकाई टेकडी: दारू, गांजा आणि भीतीचे सावट

पुणे २ मार्च २०२५: हडपसरच्या तुकाई टेकडीवर दिवसाढवळ्या दारू आणि गांजाच्या पार्ट्यांचे वाढते प्रमाण नागरिकांच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरत आहे. नुकत्याच झालेल्या शिवशाही बस बलात्कार प्रकरणानंतर पोलिसांनी गस्त वाढवण्याचे आश्वासन दिले असले, तरी प्रत्यक्षात परिस्थिती चिंताजनक आहे. चौकीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या टेकडीवर दिवसासुद्धा दारू आणि गांजाचे सेवन करणारे सर्रासपणे फिरताना दिसत आहेत.

या परिसरात सकाळी-संध्याकाळी फिरण्यासाठी येणारे नागरिक, देवदर्शनाला येणाऱ्या महिला आणि भाविकांची गर्दी असते. मात्र, दारूडे आणि गर्दुल्ल्यांच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या टोळक्यांना कोणीही हटकण्याची हिंमत करत नाही. अनेकदा दारूच्या नशेत हे युवक आपापसात भांडण करतात, ज्यामुळे परिसरातील शांतता भंग पावते.

Tukai Temple Pune Temple

टेकडीवर अनेक प्राचीन मंदिरे आहेत आणि दाट झाडीमुळे लपण्यासाठी भरपूर जागा आहे. त्यामुळे या ठिकाणी हातभट्टी आणि दारूच्या बाटल्यांचे ढिग साचले आहेत. गांजा पिण्यासाठी लागणारे साहित्य, दारूच्या बाटल्या, हातभट्टीच्या प्लास्टिक पिशव्या, गुटखा आणि सिगारेटचे तुकडे सर्वत्र विखुरलेले आहेत. शेजारीच खाणी आणि तुकाई मातेचे प्राचीन मंदिर असल्यामुळे या ठिकाणी अनेक धार्मिक कार्यक्रम होत असतात.

युवासेना जिल्हा समन्वयक शादाब मुलाणी यांनी टेकडीवरील गैरप्रकार थांबवून महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी नियमित गस्त वाढवावी, जेणेकरून नागरिकांना सुरक्षित वाटेल. परिसरात गांजा सहज उपलब्ध होत असल्याने निर्जन ठिकाणी झाडांच्या आडोशाला सेवन करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. पानटपऱ्यांवर नशा करण्यासाठी लागणारे साहित्यही सहज मिळते.

न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे