तुकाराम मुंढेंना केला होता विरोध, आता भाजपच करतंय लाॅक डाऊनची मागणी

नागपूर, २५ सप्टेंबर २०२०: नुकताच तुकाराम मुंढेंनी नागपूरचा निरोप घेतला होता. कडक शासनासाठी तुकाराम मुंढे यांना ओळखलं जातं आणि त्यासाठी त्यांचा नेहमीच विरोध देखील होत असतो. नागपूर मध्ये असताना नागपूरची कोरोनाबाबत स्थिती बिघडत असल्याचं लक्षात घेऊन त्यांनी लाॅकडाऊन करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, नागपूर मध्ये भाजपची सत्ता आहे आणि या लॉकडाऊनला नागपूर महानगरपालिकेनं विरोध केला होता. पण, आता भाजप कडूनच नागपूर शहरात लॉकडाऊन करण्याची मागणी करण्यात येत आहे.

नागपुरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललीय. रोज सरासरी ५० च्या आसपास कोरोना रुग्णांचा मृत्यू होत आहे. बिघडत चाललेली ही स्थिती पाहता कोरोना नियंत्रणासाठी महापौरांनी पालकमंत्र्यांकडं लॉकडाऊनची मागणी केलीय. महापौरांसह सर्वसामान्य नागरिकांनीही नागपुरात लॉकडाऊनची मागणी केलीय.

सध्या नागपूरमध्ये कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. नागपूरमध्ये आतापर्यंत २२६१ जणांना कोरोनामुळं आपला जीव गमवावा लागलाय. तर नागपूर मधील कोरोनाचा मृत्यूदर हा २.८७ टक्के आहे. सध्या नागपुरात ७१ हजार ६१६ कोरोना रुग्ण आहेत. यापैकी ५३ हजार ४१८ रुग्णांनी कोरोनावर मात केलीय. तर रिकव्हरी रेट ७४.५९ टक्के आहे. तसेच, कोरोना डबलिंग रेट २९.१ दिवस इतका आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा