गोल पोस्ट महाराष्ट्र तुकोबांची पालखी शनिवारी पिंपरी-चिंचवडमध्ये, रविवारी आळंदीत माउलींच्या भेटीला!

तुकोबांची पालखी शनिवारी पिंपरी-चिंचवडमध्ये, रविवारी आळंदीत माउलींच्या भेटीला!

Tukaram Maharaj Palkhi 2025
तुकोबांची पालखी;

Tukaram Maharaj Palkhi 2025: आषाढी एकादशीला पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेऊन जगद्‌गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी आता परतीच्या प्रवासाला निघाली असून, शनिवारी (दि. १९ जुलै) पिंपरी-चिंचवड शहरात तिचे आगमन होणार आहे. यंदाच्या वर्षी पालखी पिंपरी-चिंचवडमध्ये मुक्काम करून रविवारी (दि. २० जुलै) आळंदीला जाऊन माउलींची भेट घेणार आहे, आणि त्यानंतर सोमवारी (दि. २१ जुलै) देहूत परतणार आहे.

पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने जय्यत तयारी केली आहे. अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पालखी मार्गावरील स्वच्छता, विद्युत व्यवस्था, वैद्यकीय मदत केंद्रे, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, वाहतूक व्यवस्थापन आणि रस्त्यांची दुरुस्ती तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सह शहर अभियंता देवन्ना गट्टवार, माणिक चव्हाण, मुख्य उद्यान अधीक्षक महेश गारगोटे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, क्षेत्रीय अधिकारी निवेदिता घार्गे आणि तानाजी नरळे यांच्यासह अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते.

पालखीचा सविस्तर मार्ग:

रविवार, २० जुलै रोजी: पालखी पिंपरी येथून लिंकरोड भाटनगर मार्गे चिंचवडगाव, चिंचवड स्टेशन (पहिली विश्रांती), के.एस.बी. चौक (दुसरी विश्रांती), लांडेवाडी चौक (दुपारचा मुक्काम), भोसरी, आळंदी रस्ता, मॅगझिन चौक, थोरल्या पादुका (तिसरी विश्रांती), धाकट्या पादुका मार्गे श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर, आळंदी येथे मुक्कामी जाणार आहे.

सोमवार, २१ जुलै रोजी पालखी आळंदीहून देहूफाटा, डुडुळगाव, नागेश्वर मंदिर मोशी, चिखली, तळवडे, विठ्ठलवाडी मार्गे जगद्‌गुरू श्री संत तुकाराम महाराज मंदिर, देहू येथे परत येईल.

पिंपरी गावातही ग्रामस्थांनी पालखीच्या स्वागताची तयारी केली आहे. पिंपरी गावातील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिरात शनिवारी दुपारी पालखीचे आगमन होईल. यावेळी महाप्रसादाची व्यवस्था तसेच वैद्यकीय सुविधा, मदत केंद्रे आणि विश्रांती शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी हा सोहळा आध्यात्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचे पर्व असल्याचे सांगितले.
ग्रामस्थ आणि प्रशासनाच्या समन्वयातून सोहळा सुस्थितीत पार पडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे

error: Content is protected !!
Exit mobile version