तुकाराम मुंडे यांच्यावर नागपूरच्या महापौरांचा फसवणुकीचा आरोप

नागपूर, दि. २२ जून २०२० : नागपूर महापालिकेतील लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यात सुरू असलेल्या शीतयुद्धाचा शनिवारी भडका उडाला होता. शनिवारी पालिका आयुक्त तुकाराम मुंढे अचानकपणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेतून निघून गेले होते. यानंतर सर्वांनाच आश्चर्य वाटले. आता यासोबत आणखीन एक वाद समोर आला आहे. नागपूर स्मार्ट सिटी कंपनीच्या संचालक पदावरून हा वाद निर्माण झाला आहे.

नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी तुकाराम मुंढे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशन गाठले आणि मुंढेच्या विरोधात तक्रार दिली. जोशी यांनी या वादाला स्मार्ट घोटाळा असे म्हटले आहे परंतू अद्याप पोलिसांनी तुकाराम मुंढे यांच्यावर गुन्हा दाखल केलेला नाही.

काय आहे प्रकरण

मुंढे हे सध्या स्मार्ट सिटीचे सीईओ आहेत. जोशी यांनी असे म्हटले आहे की, स्मार्ट सिटी या कंपनीच्या संचालक पदावर येण्यासाठी बैठक होणे आवश्यक असते. परंतू , अशी कोणतीही बैठक न होता ते या कंपनीच्या संचालक पदावर आले आहेत. इतकेच नव्हे तर ते आता स्मार्ट सिटी या कंपनीचे सीईओ देखील झाले आहेत. महत्त्वाचे म्हणजे स्मार्ट सिटी या कंपनीची शेवटची बैठक डिसेंबर २०१९ मध्ये झाली होती. त्यानंतर तुकाराम मुंढे हे जानेवारी २०२९ मध्ये नागपूर मध्ये आले होते. ते नागपूर मध्ये आल्यापासून कंपनीची कोणतीही बैठक अद्याप झालेली नाही.

असे असताना देखील ते या कंपनीचे सीईओ कसे झाले हा प्रश्न निर्माण होतो. कंपनीचे सीईओ झाल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी बँक खात्याचे अधिकार आपल्याकडे घेतले. बँक खात्याचे अधिकार हातात आल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी २० कोटी रुपयांची बिले ठेकेदारांना दिली. यासाठी त्यांनी धनादेशावर त्यांच्या सह्या देखील केल्या आहेत असा आरोप महापौर जोशी यांनी केला आहे.

शनिवारी देखील उडाला होता वादाचा भडका

तुकाराम मुंढे यांच्याविरोधात शनिवारी नागपूर महानगरपालिकेत अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. महापौरांनी हा प्रस्ताव फेटाळला असला तरी नागपूर महानगरपालिकेत वातावरण चांगलेच तापलेले पाहायला मिळाले होते.

या सर्व प्रकारावर एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना तुकाराम मुंडे म्हणाले की, “महासभा घ्यावी की नाही यावर मी एपिडेमिक अॅक्टनुसार माझं मत महापौरांना सांगितलं होतं. शासनाकडेही मी याबाबत मार्गदर्शन मागितलं होतं. त्यांनी याबाबत अटी शर्तींचा भंग होणार नाही याची काळजी घेण्यास सांगून सूचना केल्या. त्यानंतर ही सभा झाली. सभा झाली तेव्हा मी स्वतः हजर होतो. मात्र, सभा सुरु होताच मी कोणत्याही प्रश्नावर उत्तर द्यायला तयार असताना नगरसेवक आणि इतर पदाधिकारी मी बोलत असतानाच उभे राहून अडथळा करत होते. कोणताही प्रश्न विचारायचा आणि उत्तर देण्यास सुरुवात केली की अर्ध्यावर थांबवायचं. अधिकाऱ्यांना बोलू द्यायचं नाही. त्यानंतर अर्धवट वाक्यांचा विपर्यास करुन त्याला चुकीच्या पद्धतीने सादर करायचं. सदस्यांना पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन काढण्याचा अधिकार आहे, मात्र, तो उत्तर पूर्ण देऊन झाल्यावर आहे. मात्र, उत्तर देत असतानाच अधिकाऱ्यावर मोठ्या आवाजात ओरडणं, अधिकाऱ्याच्या दिशेने अंगुलीनिर्देश करुन त्याला गप्प बसवण्याचा प्रयत्न करणं हे निंदनीय आहे.”

अधिकाऱ्यांचे मनोधैर्य खच्ची करण्याचा प्रयत्न

“हे होत असल्याने अधिकाऱ्यांचं मनोधैर्यचे खच्चीकरण होतं. त्यामुळे हा अधिकाऱ्यांचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न आहे. मी हे महापौरांच्या लक्षात आणून दिलं. तसेच हे परत झालं तर सभागृहात थांबणार नाही हे सांगितलं. यानंतरही हा प्रकार घडला. एका नगरसेवकाने तुम्ही ब्रिटिशांपेक्षाही वाईट आहात. इंग्रज तुमच्यापेक्षा बरे होते, असं विधान सातत्याने करत होते. असं होत असतानाही महापौरांनी संबंधित नगरसेवकांना कोणतीही सूचना दिली नाही. त्यांना थांबण्यास सांगितलं नाही. अशाप्रकारची शेरेबाजी करु नका असंही सांगितलं नाही. अशाप्रकारे व्यक्तिगत शेरेबाजी करण्याचा अधिकार ना अधिकाऱ्यांना आहे, ना पदाधिकाऱ्यांना. सभागृहाची शिस्त कायम ठेवणं महापौरांची जबाबदारी असताना त्यांनी तसं केलं नाही. त्यामुळे यानंतर सदस्यांनी तुम्ही तुकाराम महाराजांवर कलंक आहात हा शब्दप्रयोग केला. त्यावेळी मी उठलो आणि महापौरांना हे व्यक्तिगत प्रतिमा हनन असल्याचं सांगितलं. तसेच सभात्याग करत असल्याचं स्पष्ट केलं,” असंही तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केलं.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा