तुकाराम मुंढे यांनी काढली पशुसंवर्धन अधिकाऱ्यांची खरडपट्टी

पुणे, ७ ऑक्टोबर २०२३ : पशुसंवर्धन विभाग हा थेट शेतकऱ्यांशी संबंधित असून त्यांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य द्या तसेच योजनांची अंमलबजावणी गतिमान करण्यात अनेक जिल्हे मागे असून, ही स्थिती ३१ ऑक्टोबर अखेर बदला अन्यथा कारवाईला सामोरे जा अशा शब्दांत कामचुकार अधिकाऱ्यांची पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास सचिव तुकाराम मुंढे यांनी खरडपट्टी काढली.

औंध येथील पशुसंवर्धन आयुक्तालयात मुंढे यांच्या अध्यक्षतेखाली विभागाची राज्यस्तरीय जम्बो आढावा बैठक पार पडली आहे. या बैठकीमध्ये विविध तांत्रिक मुद्दे, विभागाच्या योजना, शेतकऱ्यांना येणारे प्रश्न, तेथील कार्यालयाच्या कामकाजातील उणिवा, संबंधित अधिकाऱ्यांची टीम वर्क म्हणून असलेली सांघिक कामगिरी यावर त्यांनी प्राधान्याने भर दिला आहे. जिल्हा योजनांची अंमलबजावणी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात कमी पडणाऱ्या अधिकाऱ्यांना मुंढे यांनी चांगलेच फैलावर घेतल्याची माहिती मिळाली आहे.

जनावरांमध्ये कृत्रिम रेतनाद्वारे गर्भधारणा होण्याचे प्रमाण ८ ते ३० टक्क्यांपर्यंत वाढले पाहिजे. कृत्रिम रेतन वाया गेल्यास संबंधित शेतकऱ्यांचे १० ते १२ हजार रुपयांचे नुकसान होते. ही स्थिती बदलण्याची गरज असून क्षेत्रीय स्तरावरील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी कामात सुधारणा करून शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या सूचनाही मुंढे यांनी दिल्या आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा