मुंबई, ३ ऑगस्ट २०२१: महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल लागल्यानंतर बारावीचा निकाल कधी लागणार याकडे साऱ्यांचेच लक्ष होते. बारावीचा निकाल कधी लागणार याची सर्वत्र चर्चा सुरू होती. अखेर बारावीच्या निकालाची तारीख जाहीर झालीय. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाच्या इयत्ता बारावीचा निकाल आज (३ ऑगस्ट) जाहीर होणार आहे. सध्याच्या कोरोनास्थितीमुळे बारावीचा निकाल हा अंतर्गत मूल्यमापन पद्धतीने जारी करण्यात येणार आहे. त्यामुळे आपला निकाल काय लागेल याची विद्यार्थ्यांना उत्सुकता लागलीय.
ट्विट करत दिली माहिती
बारावीचा निकाल ३ ऑगस्टला संध्याकाळी ४ वाजता लागणार असल्याची घोषणा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटच्या माध्यमातून केली. “महत्त्वाची सूचना: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२१ मध्ये मंडळाच्या कार्यपद्धती नुसार तयार करण्यात आलेला इ.१२वीचा निकाल उद्या दि.०३ ऑगस्ट,२०२१ रोजी दु.४:०० वा. जाहीर होईल. सर्व विद्यार्थ्यांना मनापासून शुभेच्छा!”, असे ट्विट करत वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली.
या वेबसाईट्सवर तुमचा निकाल पाहा
इयत्ता दहावीच्या निकालावेळी सर्व्हर डाऊन झाल्याने हजारो विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहता आला नाही. त्यामुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला होता. या पार्श्वभूमीवर आज मंगळवारी जाहीर होणाऱ्या इयत्ता १२ वीच्या निकालासाठी बोर्डाने चार नव्या साईट्स लॉन्च केल्या आहेत.
इयत्ता बारावीचा निकाल आज दुपारी चार वाजता लागणार असून तो ऑनलाईन पद्धतीने जाहीर केला जाईल. त्यासाठी एकूण चार वेबसाईट्स जारी करण्यात आल्या आहेत. या वेसबाईट्स खालीलप्रमाणे आहेत.
१. https://hscresult.11thadmission.org.in
२. https://msbshse.co.in
३. hscresult.mkcl.org
४. mahresult.nic.in
www.mahresult.nic.in व https://msbshse.co.in या संकेतस्थळावर विदयार्थ्यांच्या निकालाशिवाय निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे