बारावीचा निकाल जाहीर, ९०.६६% विद्यार्थी पास, मुलींनी मारली बाजी

पुणे, दि. १६ जुलै २०२०: महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ मार्फत घेण्यात येत असलेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल आज लागला आहे. यंदा राज्यात बारावीचा निकाल ९०.६६% एवढा लागला आहे. दरवर्षी निकाल जाहीर करण्यापूर्वी बोर्डाकडून पत्रकार परिषद घेतली जाते. मात्र, यंदा कोरोना संकटामुळे पत्रकार परिषद न घेता फक्त एक प्रेस नोट जारी करुन या निकालाबाबतची माहिती देण्यात आली आहे.

कोकण विभागाने मारली बाजी

राज्याचा निकाल ९०.६६ टक्के लागला असून यंदा कोकण विभागाने बाजी मारली आहे. कोकण विभागाचा निकाल ९५.८९ टक्के सर्वाधिक लागला आहे. यंदा औरंगाबाद विभागाचा निकाल ८८.१८ टक्के असा सर्वांत कमी लागला आहे. पुणे विभागाचा निकाल ९२.५० टक्के लागला असून राज्यात कोकण विभागानंतर पुणे विभाग दुसऱ्या क्रमांकावर आहे.

मुलींनी मारली बाजी

तर दरवर्षीप्रमाणे यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी राज्याचा एकूण निकाल ४.७ टक्क्यांनी वाढला आहे. बारावीची परीक्षा दिलेल्यापैकी ९३.८८ टक्के मुली आणि मुले ८८.०४ टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत.

कला शाखाचे निकाल ८२.३३ टक्के, वाणिज्य शाखेचा निकाल ९१.२७ टक्के तर विज्ञान शाखेचा निकाल ९६.९३ टक्के लागला आहे. त्याशिवाय MCVC ९५.०७ टक्के निकाल लागला आहे.

निकाल कोणत्या वेबसाईटवर पाहता येणार

> www.mahresult.nic.in

> www.hscresult.mkcl.org

> www.maharashtraeducation.com

असा पहा निकाल

> वरीलपैकी एका वेबसाईटवर जा

> वेबसाईटवर दिलेल्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा

> आसन क्रमांक टाका

> विचारलेली योग्य माहिती द्या (सामान्यपणे आईचे पहिले नाव विचारले जाते)

> निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल

> निकालाची प्रिंट आऊटही काढता येईल

विभागानुसार निकाल

पुणे : ९२.५० टक्के

नागपूर : ९१.६५ टक्के

औरंगाबाद : ८८.१८ टक्के

मुंबई : ८९.३५ टक्के

कोल्हापूर : ९२.४२ टक्के

अमरावती : ९२.०९ टक्के

नाशिक : ८८.८७ टक्के

लातूर : ८९.७९ टक्के

कोकण : ९५.८९ टक्के

यंदाच्या वर्षी बारावीच्या परीक्षेसाठी १५ लाख ५ हजार २७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १३ हजारांनी अधिक आहे. १८ फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ मंडळांमार्फत परीक्षा घेण्यात आली.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा