मुंबई, २६ नोव्हेंबर २०२०: मुंबई दहशतवादी हल्ल्याला आज बारा वर्षे पूर्ण झाली आहेत. २६ नोव्हेंबर २००८ रोजी पाकिस्तान मधून समुद्रामार्गे आलेल्या दहशतवाद्यांच्या पथकाने मुंबईत एकाच वेळी अनेक ठिकाणी हल्ला केला. या हल्ल्यात सुमारे १६८ लोक ठार झाले.
मुंबई हल्ल्याच्या स्मृती दिनानिमित्त जम्मू-काश्मीरमधील अनेक ठिकाणी पाकिस्तानविरूद्ध पोस्टर लावले गेले आहेत. या पोस्टर्समध्ये पाकिस्तानच्या वाईट कृत्यांचे वर्णन आहे. राजबाग, टीआरसी, बारामालू आणि हैदरपुरा या भागात ही पोस्टर्स लावण्यात आली आहेत.
एका पोस्टरमध्ये पाकिस्तानच्या वाईट कृत्यांचा खुलासा करताना असे लिहिले गेले आहे की, आम्ही पाकिस्तानने केलेल्या कारस्थानांना कधीही विसरू शकणार नाही.
या हल्ल्याबाबत ह्या पोस्टर मध्ये असेही लिहिले गेले आहे की दहशतवाद्यांनी हल्ला करून कोणतीही दया भावना न दाखवता शेकडो लोकांचा जीव घेतला तर कशाप्रकारे या आतंकवाद्यांनी आपला आत्मविश्वास तोडण्याचा प्रयत्न केला. या आतंकवाद्यांनी कशाप्रकारे आपल्याला हतबल करून ठेवल होतं. शेवटी असेही लिहिले आहे की पाकिस्तान आणि त्याच्या पुरस्कृत दहशतवाद्यांनी २६ नोव्हेंबर रोजी दहशत निर्माण केली. दहशतवादाविरूद्ध आपण सर्वजण एकत्र आहोत.
पाकिस्तानी दहशतवादी कसाबसह १० दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला केला. दहशतवाद्यांनी मुंबई रेल्वे स्थानकावर प्रवाशांवर अंदाधुंद गोळीबार केला. यावेळी अनेक लोक ठार झाले. याशिवाय दहशतवाद्यांनी ताज हॉटेल आणि ज्यू धर्मातील उपासनास्थळांनाही लक्ष्य केले. या हल्ल्यात सुरक्षा दलाने दहशतवादी कसाबला जिवंत पकडले. नंतर त्याला फाशी देण्यात आली.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे