नवी दिल्ली, १७ फेब्रुवारी २०२३ : प्रसिद्ध मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म असलेल्या ट्विटर या कंपनीचा खर्च कमी करण्यासाठी आणि महसूल वाढवण्यासाठी एलन मस्ककडून अनेक निर्णय घेतले जात आहेत. आता त्यांने मुंबई आणि दिल्लीतील ट्विटरचे कार्यलय बंद करण्याचा निर्णय घेत, कमर्चाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याचे आदेश दिले आहेत.
- मुंबई आणि नवी दिल्लीतील ऑफिस बंद
मिळालेल्या माहितीनुसार, ट्विटरने भारतातील आपल्या तीन ऑफिस पैकी दोन ऑफिस बंद केले आहेत. या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना घरुन काम (वर्क फ्रॉम होम) करण्याचे आदेश देण्यात आले आहे. यामध्ये मुंबई आणि नवी दिल्ली या ठिकाणी असणारे ट्विटरचे ऑफिस बंद करण्याचा निर्णय ट्विटरने घेतला असून आता फक्त बंगळूरुमधील ट्विटरचे ऑफिस सुरु राहणार आहेत. या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नियमितपणे पुर्वी प्रमाणेच ऑफिसमधून काम सुरु ठेवावे लागणार आहे. ब्लूमबर्ग न्यूजने याबद्दलचा रिपोर्ट दिला आहे.
कॉस्ट कटींगसाठी ट्विटरने जगभरातील ऑफिसेस बंद करण्याचा निर्णय हा घेण्यात आला आहे. यापूर्वी देखील ट्विटरने भारतासह जगभरातून मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांना नारळ दिला होता. या निर्णयानंतर एलन मस्कवर मोठ्या प्रमाणावर टीका देखील झाली होती. एलन मस्कने कंपनीचा महसुल वाढवण्यासाठी ब्लू सब्सक्रिप्शन सारखी सेवा निर्माण केली. २०२३ च्या शेवटपर्यंत ट्विटरला आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्याचा एलन मस्कचा मानस आहे.
दरम्यान, मागील वर्षी मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात केल्यानंतर त्यांनी आमच्याकडे या शिवाय पर्याय नव्हता असे उत्तर दिले होते. त्यावेळी कंपनीला दररोज ४० लाख डॉलरचे नुकसान होत असल्याचे देखील त्याने सांगितले होते.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.